पिंपरी चिंचवड महापालिकेने सहा कंपन्यांना मोठा दणका दिला आहे. इंद्रायणी नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीचा प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत होता. अखेर मनपाने सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या जलनि:सारण विभागातर्फे तक्रार देण्यात आली होती.
तळवडेपासून डुडुळगावपर्यंत आणि आळंदी हद्दीपासून -होलीपर्यंत इंद्रायणी नदीची हद्द आहे. चिखलीपासून मोशीपर्यंत नदीच्या परिसरात अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या पर्यावरण विभागाचे कोणतेही नियम पाळत नाहीत. भोसरी MIDC तील बहुतांश कंपन्यांचे सांडपाणी नदीत सोडले जात होते. अनेक सामाजिक संघटना इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने मांडत होत्या. त्यानंतर महानगरपालिकेने पाहणी केली असता, अनेक कंपन्या व लघुउद्योजकांनी कंपन्यांमधील सांडपाणी नदीत सोडल्याचे दिसून आले. या कंपन्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
( हेही वाचा: उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला; शेकडो एकर शेती पाण्यात )
असा उघड झाला प्रकार
इंद्रायणी नदीला मिळणा-या नाल्यांमधून रंगीत पाणी येत होते. त्यासंदर्भातील तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन व कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांनी पाहणी केली. त्यात सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्यांतील सांडपाणी नदीत सोडल्याचे आढळून आले.
Join Our WhatsApp Community