फाळणीचे घाव; अजूनही हिंदू ‘घायाळ’

194

भाषाप्रभू पु. भा. भावे यांच्या फाळणीवरील कथांवर आधारित ’घायाळ’ या नाटकाचा प्रयोग संस्कार भारती मुंबई च्या पुढाकाराने २८ जानेवारी रोजी स्वा. सावरकर स्मारक सभागृह दादर येथे झाला. या कथांचे नाट्यरूपांतर शैलेश चव्हाण यांनी केले असून दिग्दर्शन कविता विभावरी यांनी केले आहे. महत्वाचं म्हणजे या प्रयोगाला राजदत्त यांची उपस्थिती लाभली. घायाळ हे नाटक खरंतर प्रत्येक भारतीयाने पाहिले पाहिजे.

( हेही वाचा : Ind vs Aus : भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या परावभानंतर ऑस्ट्रेलिया घेणार महत्त्वाचा निर्णय)

हा भयानक इतिहास आपल्यापासून लपवून ठेवण्यात आला. त्यामुळे पुढची पिढी बेसावध झाली आणि सर्वधर्मसमभाव या खोट्या प्रचाराला बळी पडली. कॉंग्रेसने अनेक मोठ्या राजकीय चुका केल्या आहेत. त्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अतिरेक, अहिंसेचा अतिरेक, फाळणी आणि फाळणीचं अतिशय खराब व्यवस्थापन या स्वातंत्र्यापूर्वीच्या मोठ्या चुका. हिंदूंना सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे, ब्राह्मण समाजाला दोषी ठरवणे, भारतात हिंदू भावविश्व निर्माण न करता फोल ठरलेल्या हिंदी राष्ट्रवादाच्या नावाखाली नवा व खोटा सेक्युलरवाद राबवणे अशा अनेक चुकांमुळे हिंदू समाजाचं अतोनात नुकसान झालं आहे.

ज्या देशाला आपला इतिहास व्यवस्थित माहित नसतो त्या देशाचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला फाळणीचा इतिहास माहिती असलाच पाहिजे. त्या दृष्टीने हे नाटक अतिशय महत्वाचं ठरतं. हिंदू समाजाची समस्या अशी आहे की हिंदूला दुखापत झाली तरी लक्षात येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंजाब आणि बंगाल. फाळणीमुळे पंजाब आणि बंगालवर अनन्वित अत्याचार झाले. तरी इथल्या लोकांना अजूनही याची जाणीव झालेली नाही.

या दोन्ही राज्यातली परिस्थिती फारशी चांगली नाही. दोन्ही राज्यातले हिंदू निद्रिस्त आहेत. त्यांना कुणीतरी ओरडून सांगायला हवं की अहो तुमच्यावर अन्याय झाला आहे. तुमचा छळ करण्यात आला आहे. कॉंग्रेसने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपला इतिहास लपवला अथवा दूषित केला. ज्या ज्या देशांनी सेक्युलरवाद राबवला त्या देशांमध्ये आज कट्टरपंथीयांची धार्मिक समस्या उद्भवली आहे. ही समस्या अधिक बिकट होत जाणार आहे. आपल्या शेजारचा पाकिस्तान नावाच्या देशाला कट्टरतेची शिक्षा मिळाली आहे.

जगासमोर वाडगा घेऊन जाण्याची परिस्थिती त्यांच्यावर उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर कट्टरपंथीयांचा खरा इतिहास जर देशासमोर ठेवला, तर पुढची पिढी सावध होते.भाषाप्रभू पु. भा. भावे हे सावरकरांचे अनुयायी होते. अतिशय उत्कृष्ट साहित्यिक, परंतु हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांच्याकडे रसिकांचे दुर्लक्ष झाले. हिंदुत्ववादी असणे म्हणजे पाप असा तो काळ होता. या नाटकाच्या निमित्ताने ही परिस्थिती बदलण्यास मदत होऊ शकेल. त्यासाठी जागोजागी या नाटकाचे प्रयोग झाले पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. दुर्दैवाने हिंदू एक असा अश्वत्थामा आहे, जो अजूनही घायाळ आहे, परंतु आपण घायाळ आहोत या सत्यापासून तो अनभिज्ञ आहे. आणि याची जाणीव घायाळ हे नाटक करुन देतं. यासाठी घायाळ या नाटकाच्या संपूर्ण समुहाचे कौतुक करायला हवे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.