यंदा आपण भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. या निमित्ताने आपण सर्वजण एका अतिशय अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. हे महान भाग्य देवाने आपल्याला दिले आहे. एकूणच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरुप मिळाल्याचे बघून मला आनंद होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ या विशेष चळवळीचे आयोजन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा एक भाग बना आणि प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा फडकवा किंवा तुमच्या घरी लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केले. रविवारी या कार्यक्रमाचा ९१ वा भाग होता.
( हेही वाचा : ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका मुख्यमंत्र्यांचे जाहीर आवाहन)
अमृतकाळ प्रत्येक देशवासीयांसाठी कर्तव्यकाळ
ते पुढे म्हणाले की, आपण सर्व देशवासियांनी आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पाळले पाहिजे. तरच आपण त्या अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करू शकू, हाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात होत असलेल्या या सर्व कार्यक्रमांचा सर्वात मोठा संदेश आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील भारत घडवता येईल. म्हणूनच आपला पुढील २५ वर्षांचा हा अमृतकाळ प्रत्येक देशवासियांसाठी कर्तव्यकाळ आहे. आपल्या शूर सैनिकांनी ही जबाबदारी आपल्याला दिली आहे आणि ती पूर्ण करण्याचा निश्चय करायचा आहे.
अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरूप मिळाल्याचे बघून मला आनंद
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरूप मिळाल्याचे बघून मला आनंद होत आहे. समाजातील सर्व स्तरातील आणि समाजातील प्रत्येक घटकातील लोक या महोत्सवाशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. स्वातंत्र्याच्या संघर्षात भारतीय रेल्वेचे योगदान सगळ्यांना कळावे, यासाठी आझादीची रेल्वे आणि रेल्वे स्टेशन नावाचा उपक्रम केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे. झारखंडचे गोमो जंक्शनचे आता नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमोमध्ये नामांतरण करण्यात आले आहे. या स्थानकावर कालका मेलमध्ये चढून ब्रिटिश अधिकाऱ्यांना चकमा देण्यात नेताजी सुभाष यशस्वी झाले होते. देशभरातील २४ राज्यांमध्ये अशा ७५ रेल्वे स्थानकांची ओळख पटली आहे. या ७५ स्थानकांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली असून यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत.
स्वातंत्र्यदिन साजरा केल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी कळवा!
देशवासियांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून १३ ते १५ तारखेपर्यंत ‘हर घर तिरंगा’ या विशेष चळवळीचे आयोजन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा एक भाग बनून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तुम्ही तुमच्या घरी तिरंगा फडकावा किंवा तुमच्या घरी लावा. तसेच २ ते १५ ऑगस्टपर्यंत आपण सर्वजण आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चरमध्ये (DP) तिरंगा लावू शकतो. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही कसा साजरा केलात, कोणत्या विशेष गोष्टी केल्या या सर्वांची माहिती मला जरूर कळवा. असे आवाहनही त्यांनी केले.
मध उत्पादनातून शेतकऱ्यांसह तरुणांची स्वयंरोजगाराकडे वाटचाल
आपल्या पारंपारिक आरोग्य शास्त्रात मधाला किती महत्त्व दिले जाते. आयुर्वेद ग्रंथात मधाचे अमृत म्हणून वर्णन केले आहे. मध केवळ चवच देत नाही तर आरोग्यही देते. आज मध उत्पादनात इतक्या शक्यता आहेत की शिक्षण घेणारे तरुणही यातूनच आपला स्वयंरोजगार बनवत आहेत. तरुणांच्या मेहनतीमुळे आज देश इतका मोठा मध उत्पादक बनत आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की देशातून मधाची निर्यातही वाढली आहे. मधाचा गोडवा आपल्या शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे आणि त्यांचे उत्पन्न वाढवत आहे.
भारतीय खेळाडू, विद्यार्थ्यांचे कौतुक
राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना हा कालावधी कर्तृत्व गाजवणारा ठरला आहे. त्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आहे. यात पीव्ही सिंधू, नीरज चोप्रा यांसह अन्य भारतीय खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले आहे. यासोबतच देशभरात नुकतेच दहावी, बारावीचे निकालही जाहीर झाले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ज्यांनी आपल्या परिश्रम आणि समर्पणाने यश संपादन केले आहे. महामारीमुळे गेली दोन वर्षे अत्यंत आव्हानात्मक होती. या परिस्थितीत तरुणांनी दाखवलेले धैर्य आणि संयम अत्यंत कौतुकास्पद आहे. या सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community