Jan Samarth Portal: ऑनलाइन कर्ज घेणं होणार सोपं, आता १३ सरकारी योजना मिळणार एकाच प्लॅटफॉर्मवर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जून म्हणजेच आज जन समर्थ पोर्टलचे लोकार्पण केले. या पोर्टलच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना आणि या योजनांनुसार आता ऑनलाइन कर्ज घेणं सोपं होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले असून या पोर्टलचे नाव जन समर्थ पोर्टल असे असणार आहे. या नव्या पोर्टलमुळे विविध सरकारी कार्यालयात जनतेला सारख्या मारव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. जन समर्थ पोर्टलद्वारे आता 13 सरकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे.

(हेही वाचा – Special Coin: पंतप्रधान मोदी जारी करणार नाण्यांची नवी सिरीज, ‘ही’ आहेत वैशिष्ट्य)

कर्जाच्या अर्जापासून ते मंजुरीपर्यंत सर्व ऑनलाइन

मिळालेल्या माहितीनुसार, या पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. सध्या चार प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करण्याची सुविधा असणार आहे. यामध्ये शिक्षण, कृषी पायाभूत सुविधा, व्यवसाय स्टार्ट अप आणि लिव्हिंग लोन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जन समर्थ पोर्टलद्वारे कर्जाच्या अर्जापासून ते तो अर्ज मंजुर होईपर्यंत सर्व काही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्जदारांना या पोर्टलवर त्यांच्या कर्जाची स्थिती कुठं पर्यंत आली हे तपासता येणार आहे. जर कर्ज मिळाले नाही तर अर्जदारांना ऑनलाइन तक्रारही करता येणार आहे.

३ दिवसात तक्रार काढणार निकाली

अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही तीन दिवसांत निकाली काढावी लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते, जन समर्थ पोर्टलवर अर्जदारासोबत बँका आणि विविध लहान-मोठ्या कर्ज देणाऱ्या संस्थाही उपलब्ध असणार असून जे कर्जासाठी येणाऱ्या अर्जावर त्यांची मान्यता देऊ शकतील. असे सांगितले जात आहे की, सध्या बँकांसह १२५ हून अधिक वित्तीय संस्था या पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत.

जन समर्थ पोर्टल म्हणजे नेमकं काय?

जन समर्थ हे एक डिजिटल पोर्टल असून 13 कर्ज देणाऱ्या सरकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर जोडल्या गेल्या असून उपलब्ध आहेत. लाभार्थी सोप्या पद्धतीने त्यांची पात्रता डिजिटल पद्धतीने तपासू शकतात आणि पात्र योजनांसाठी ते ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच त्याकरता डिजिटल मान्यता देखील मिळवू शकतात.

अर्ज करण्यासाठी कोण ठरणार पात्र?

या पोर्टलमार्फत कोणताही भारतीय अर्ज करू शकतो. मात्र, कर्जाच्या श्रेणीत तुम्हाला तुमची पात्रता तपासावी लागणार आहे. जर तुम्ही संबंधित योजना, कर्जासाठी पात्र असाल तर ऑनलाइन माध्यमातून कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या चार कर्जाच्या श्रेणी उपलब्ध असून प्रत्येक कर्ज श्रेणीत सरकारच्या काही योजना उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज करताना काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यानुसार तुमची पात्रता तपासली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here