शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा

268

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची प्रतिमा उंचावलेली आहे. विकसित देशांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे जगभरात पंतप्रधान मोदी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. आता म्हणूनच पंतप्रधान मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोबेल समितीमधील सदस्याकडूनच तसे संकेत देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठीचे प्रबळ दावेदार असल्याचे वक्तव्य नोबेल समितीचे सदस्य ॲस्ले टोजे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक विश्वासार्ह नेतृत्त्व असून ते दोन देशांमधील युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करु शकतात, असे टोजे यांनी म्हटले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांच्यासारख्या सक्षम नेत्याच्यादृष्टीने तो ऐतिहासिक क्षण ठरेल. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच भारत आजघडीला संपन्न आणि सामर्थ्यशाली देशांच्या पंक्तीत विराजमान आहे, अशी स्तुतीसुमने ॲस्ले टोजे यांनी उधळली. नोबेल समितीच्या उपनेत्याने इतके उघडपणे संकेत दिल्यामुळे यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळण्याची शक्यता कैकपटीने वाढल्याची चर्चा आहे. टोजे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया आणि इतर व्यासपीठांवर पंतप्रधान मोदींना नोबेल पुरस्कार मिळणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. नरेंद्र मोदी हे केवळ भारतालाच पुढे नेत नाहीत तर ते जगात शांतता नांदण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून भारताकडून सुरु असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. नरेंद्र मोदी हे जगातील शांततेसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याचे मत टोजे यांनी व्यक्त केले.

(हेही वाचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.