इंटरनेट क्षेत्रात भारत शनिवार, १ ऑक्टोबरपासून नवीन क्रांती घडवून आणणार आहे. भारतात सुपरफास्ट इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे 5G इंटरनेट सेवेची सुरुवात होणार आहे. यामुळे इंटरनेटचा वेग इतका वाढणार आहे की, २ तासांचा चित्रपट अवघ्या ३ सेकंदात डाउनलोड होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते होणार शुभारंभ
नवी दिल्लीतील प्रगती मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी 5G सेवेचा शुभारंभ करणार आहेत. 5G तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. 5G तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल. गेल्या काही दिवसांपासून देशभरात 5G ची चर्चा होती. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशात लवकरच 5G सेवा सुरु होणार असल्याचे वारंवार सांगितले होते. तसेच दोन वर्षांमध्ये देशभरात 5G चे जाळे उभारण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
दहा पटीने वेग वाढणार
3G आणि 4G च्या तुलनेत 5G चा वेग अतिशय जास्त आहे. 4G च्या तुलनेत 5 जी दहा पटीने वेगाने सेवा देणार आहे. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण एन्ड टू एन्ड नेटवर्क भारतात तयार करण्यात आले आहे.