पंतप्रधानपद हे केजरीवालांसाठी आत्महत्या ठरेल!

136

सध्या ५ राज्यांच्या निवडणूकीचे निकाल लागलेले आहेत. पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपची सत्ता आलेली आहे. पंजाबमध्ये आपने निर्विवाद यश मिळवलं आहे. सकाळपासून निकाल पाहत होतो. अनेक विश्लेषक चर्चा करत होते. त्यात एक असा सूर लावला जातोय की पंजाबमध्ये भाजपा पराभूत झालीय. तर प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की पंजाबमध्ये कॉंग्रेस पराभूत झालीय. कारण त्यांची सत्ता तिथे होती. पंजाबमध्ये भाजपने वाईट कामगिरी केलीय हे सत्यच आहे.

अजून एक सूर उमटला जातोय. ते म्हणजे आप सारख्या एका प्रादेशिक पक्षाने दिल्लीनंतर पंजाब हे राज्य जिंकलेलं आहे आणि असं यश इतर कोणत्याच प्रादेशिक पक्षाला मिळवता आलेलं नाही, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट केलं जातंय. ह्या सगळ्या विश्लेषकांनी किमान गुगल सर्च करण्याची तरी आवश्यकता आहे. आप ने २०१३ मध्ये दिल्लीतून निवडणूक लढवायला सुरुवात केली असली तरी तो प्रादेशिक पक्ष कधीच नव्हता. अण्णा हजारेंचं आंदोलन हे राष्ट्रीय स्तरावरचं होतं व ते आंदोलन हायजॅक करुन केजरीवालांना राष्ट्रीय स्तरावरील राजकारणच करायचं होतं. सुरुवात दिल्लीपासून केली एवढंच.

( हेही वाचा : बाहेरगावी जाणा-यांसाठी चांगली बातमीः बंद केलेली ‘ही’ सेवा रेल्वेने पुन्हा केली सुरू )

बरं, हे काय मी माझ्या पदरचं म्हणत नाही. आम आदमी पक्षाने २०१४ च्या लोकसभेत तब्बल ४३२ उमेदवार उतरवले होते. कोणता प्रादेशिक पक्ष इतके उमेदवार उतरवतो? त्यांनी स्वतःला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्टही केलं होतं, कारण तोच एक चेहरा त्यांच्याकडे होता. २०१४ च्या लोकसभेत त्यांना केवळ ४ जागा जिंकता आल्या. मग २०१९ ला ते बॅकफूटवर गेले आणि केवळ ३५ जागा लढवल्या व १ जिंकता आली. २०१४ च्या पराभवानंतर मात्र केजरीवाल दिल्लीत ठाण मांडून बसले.

रणनीतीचा भाग

माझा मुद्दा हाच आहे की, केजरीवाल हे असे धूर्त राजनेता आहेत, त्यांना कळलं की आपण मोदींना देशात पराभूत करु शकत नाही. म्हणूनच ते बॅकफूटवर गेले आणि निर्विवादपणे दिल्लीची सत्ता उपभोगत बसले. नंतर त्यांनी पंजाबकडे आपली दृष्टी वळवली. माझं चुकत नसेल तर २०१४ च्या लोकसभेत त्यांना ज्या ४ सीट्स मिळाल्या होत्या त्या पंजाबमधून मिळाल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांना मिळालेली १ जागा ही सुद्धा पंजाबचीच होती. म्हणजे २०१४ मध्ये पंजाबने केजरीवालांना एक इशारा दिला होता. तो इशारा केजरींवाल यांनी अचूक हेरला आणि आज जो भव्य विजय त्यांना मिळाला आहे, तो त्यांच्या रणनीतीचा एक भाग आहे.

अचानक मतदाता कधी मेहेरबान होती नाहीत हे राजकीय पंडितांना कळायला हवं. दिल्लीत कॉंग्रेस चांगली कामगिरी करेल असं बिच्चार्‍या राजकीय पंडितांना वाटत होतं. पण सो कॉल्ड भारत की बेटी प्रियांका वाद्रा ह्यांनी या राजकीय पंडितांना अक्षरशः धोबीपछाड केलेलं आहे. आपण या लेखात केवळ आपविषयी चर्चा करणार आहोत.

तर आपची ही पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली त्यावरुन हेच लक्षात येतं की आप हा प्रादेशिक पक्ष नाही. तो पवार साहेबांच्या पक्षासारखा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे. पण ह्या दोन पक्षांमध्ये विरोधी मुद्दा म्हणजे पवार साहेबांचा पक्ष नाइलाजाने प्रादेशिक झालेला आहे आणि केजरीवालांचा पक्ष रणनीतिमुळे प्रादेशिक झालेला आहे. आपल्याला नरेंद्र मोदींना हरवता येणार नाही हे कटू सत्य केजरींवालांनी स्वीकारलं आणि पचवलंही. यासाठी केजरीवाल यांचे करावं तितकं कौतुक कमीच आहे. आता हे राजकीय पंडितांना का कळत नाही? त्यांनी लगेच २०२४ साली मोदींना टक्कर देण्यासाठी केजरीवाल यांना समोर उभं केलं सुद्धा.

ह्या बिचार्‍या राजकीय पंडितांची समस्या अशी आहे की त्यांना स्वतःला मोदी नकोत. म्हणून ते मोदींना हरवण्यासाठी कुणालाही त्यांच्यासमोर उभं करत असतात. मग त्यांना राहुल गांधी, शरद पवार साहेब, ममता दीदी व अगदी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा चालतील. मग केजरीवाल काय वाईट आहेत नाही का!

पक्षासाठी उत्तम रणनीती

पण माझं असं मत आहे की केजरीवाल यांनी ह्या राजकीय पंडितांकडे कानाडोळा केला पाहिजे. कारण त्यांची जी रणनीति आहे की मोदींना पराभूत करता येत नाही. ही रणनीती त्यांच्या पक्षासाठी अतिशय उत्तम आहे. त्यापेक्षा त्यांनी इतर राज्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं तर त्यांच्या पक्षाला अधिक बळ मिळेल. दिल्ली आणि पंजाब आपल्या हातातून जाणार नाही याकडेही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी कॉंग्रेसने जो मूर्खपणा केला तसा मूर्खपणा करायची मुळात गरज नाही. तुम्ही जनतेची कामे करुन विकास करुन पुन्हा मते मिळवू शकता हे उत्तर प्रदेशच्या निकालावरुन आपल्या सर्वांच्याच लक्षात आलं असेल.

म्हणून केजरीवाल यांनी ह्या भूलथांना बळी पडता कामा नये. सध्या ममता दीदी राष्ट्रीय राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा तापट स्वभाव पाहता ते ह्या राजकीय पंडितांच्या भूलथापांना बळी पडतील अशी चिन्हे आहेत. केजरीवाल हे विचारी आहेत. त्यांच चेहरा सुद्धा अतिशय सामान्य आहे, त्यांचा पोशाख अतिशय सामान्य आहे. ते तसेच आहे की आम आदमी हे त्यांच्या पक्षाचं नाव खरं ठरवण्यासाठी तसे वागतात हा प्रश्न आपण न विचारलेलाच बरा!

सपशेल आत्महत्या ठरेल

तर महत्वाचा मुद्दा असा की २०२४ साली जर केजरीवाल राजकारणाची कसलीही जाण नसणार्‍या, एसी रुममध्ये बसून भारतावर लेक्चर झाडणार्‍या राजकीय पंडितांच्या नादाला लागून राज्यांवरचं आपलं लक्ष काढून स्वतःला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करुन लोकसभेच्या निवडणूकीत उतरले तर त्यांच्या पक्षाला उतरती कळा लागेल. कारण लोकांना आता कॉंग्रेस नकोय हे लोकांनी ठरवून टाकलेलं आहे. लोक प्रादेशिक पक्षांनाही कंटाळलेले आहेत. मग ज्या लोकांना भाजप नकोय त्यांना कुणीतरी पर्याय म्हणून हवा असेल ना? तो पर्याय आप ठरु शकतो. पण देशात ते मोदींना हरवू शकत नाही हे सत्य त्यांनी गजनीतल्या आमीर खान प्रमाणे सगळीकडे लिहून ठेवायला पाहिजे आणि देशात मोठ्या प्रमाणात ताकद लावण्यापेक्षा राज्या-राज्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नाहीतर ती सपशेल आत्महत्या ठरेल.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
[email protected]

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.