शिवसेनेचे आमदार असलेल्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघात अनेक झाडांवर विषप्रयोग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुनर्विकासात अडसर ठरणाऱ्या सुमारे १५ ते २० झाडांवर रासायनिक प्रक्रिया करून त्यांची कत्तल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा : मुंबईकर गॅस्ट्रो आणि मलेरियाने त्रस्त! पालिकेने केले काळजी घेण्याचे आवाहन)
झाडावर विषप्रयोग
विक्रोळी पूर्वेतील कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक २२० आणि २२२चे पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात नारळाची तसेच इतर मोठी झाडे आहेत, आजूबाजूचा परिसर हिरवा असताना काही झाडे सुकलेली असल्याचे काही नागरिकाच्या लक्षात आले. जागरूक नागरिक असलेल्या एकाने या झाडांचे निरीक्षण केले असता १० ते १५ झाडांची पाने सुकू लागली होती, फाद्या सुकलेल्या होत्या, आजूबाजूचा परिसर हिरवागार असताना ही झाडे का सुकली म्हणून येथील नागरिकाने चौकशी केली असता या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स या विकासकाकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली. तसेच त्यांच्या पुनर्विकासामध्ये ही झाडे अडथळा निर्माण करत असल्यामुळे यावर रासायनिक प्रक्रिया राबवून या झाडांवर विषप्रयोग केल्याचे समोर आले. या व्यक्तीने महानगरपालिकेत याबाबत चौकशी केली असता वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स यांनी झाडे तोडण्यासाठी परवानगी घेतलेली नसून बेकायदेशीररित्या या झाडावर विषप्रयोग केल्याचे समोर आले.
गुन्हा दाखल
याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात वैभवलक्ष्मी डेव्हलपर्सचे विकासक डॉ. रामदास सांगळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात डॉ. रामदास सांगळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community