फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करुन टोळी झाली मालामाल! काय झाले पुढे?

या टोळीविरुद्ध शिवाजी पार्क, मुंबई सेंटर, दादर, कल्याण, ठाणे रेल्वे पोलिस खंडणी, जबरी चोरीचे २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

सीएसटीएम ते कल्याण, चर्चगेट ते विरार रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करणाऱ्या टोळीचा दादर रेल्वे पोलिसांनी बिमोड केला आहे. या टोळीतील म्होरक्यासह ६ जणांना पोलिसांनी खंडणी, जबरी चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांत अटक केली आहे. टोळीत तीन महिलांचा समावेश असून, या टोळीने हप्ते खोरीतून कोट्यावधींची संपत्ती कमावली असल्याची माहिती दादर रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिली.

टोळीची हप्तेवसुली

संतोषकुमार सिंह उर्फ बबलू ठाकूर, समीर लालझरे, संजय मोहिते, दीपाली कामठे, लता पवार उर्फ आयशा शेख आणि रिटा सिंह असे अटक करण्यात आलेल्या या टोळीचे नाव आहे. ही टोळी दादर, गोवंडी, नवी मुंबई परिसरात राहणारी आहे. या टोळीचा म्होरक्या संतोषकुमार आहे. ही टोळी मुंबईतील रेल्वे स्थानकात, पादचारी पूल, तसेच स्थानकाबाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून जबरदस्ती हप्ते गोळा करुन, हप्ते न देणाऱ्यांवर ही टोळी हल्ले करत होती. मुंबईतील सीएसटीएम पासून कल्याण पर्यंत ते चर्चगेट पासून विरार पर्यंत या टोळीची हप्ते वसुली सुरू असायची. या टोळीविरुद्ध शिवाजी पार्क, मुंबई सेंटर, दादर, कल्याण, ठाणे रेल्वे पोलिस खंडणी, जबरी चोरीचे २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

(हेही वाचाः नायजेरियनकडून एनसीबी अधिकाऱ्यांवर पुन्हा हल्ला! ५ अधिकारी जखमी )

पोलिसांनी रचला सापळा

दादर रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी या टोळीच्या अटकेसाठी एक विशेष पथक तयार करुन, ते टोळीच्या मागावर लावले होते. काही दिवसांपूर्वी या टोळीचा म्होरक्या संतोषकुमार उर्फ बबलू ठाकूर गोवंडी परिसरात आपल्या साथीदारांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती दादर रेल्वे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचून, या टोळीवर पाळत ठेवली. त्यावेळी पोलिस आपल्या मागावर असल्याचे कळताच, बबलू ठाकूर याने वॅगनार गाडीतून पळ काढला.

गोळा केली संपत्ती

दादर रेल्वे पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन, मुलुंड पूर्व टोलनाका येथून त्याला आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर इतर साथीदारांना अटक करण्यात आली. संतोषकुमारने फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करुन मुंबईत नऊ घरे, कोट्यावधींचे दागिने, महागडी वाहने विकत घेतली आहेत. ही सर्व संपत्ती त्याने पत्नी रिटा हिच्या नावावर केली आहे. तसेच पोलिसांनी लता पवार उर्फ आयषा हिच्याकडून लाखोंची रोकड आणि दागिने जप्त केले असून, इतर दोघांजवळ पोलिसांना एका राजकीय पक्षाचे लेटरहेड मिळाले असल्याची माहिती, वरिष्ठ पोलिस निरीक्षक काटकर यांनी दिली.

(हेही वाचाः दादरचे फेरीवाले होणार तिसऱ्या लाटेचे ‘कोरोना स्प्रेडर’!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here