एक कोटीच्या ‘सुपारी’ वरून मुलुंडमध्ये गोळीबार

181

एक कोटी रुपयांच्या सुपारी चोरांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याची घटना मुलुंड पश्चिम येथे मंगळवारी सायंकाळी घडली. या गोळीबारात अथवा हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नसून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

एक कोटीच्या सुपारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मीरा-भायंदर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवारी रात्री एका गोदामातून एक कोटी किंमतीच्या सुपारी ट्रकमध्ये भरून चोरी करून पळून जाणाऱ्या चोरांना पकडण्यासाठी भायंदर पोलिसांनी खाणीवडी टोल नाका याठिकाणी नाकाबंदी लावली होती.

(हेही वाचाः लाचखोरीची रक्कम घेऊन पळाला पोलिस अधिकारी! कसा ते वाचा…)

काय झाले नेमके?

त्यावेळी पोलिसांनी चोरलेली सुपारी घेऊन जाणारा ट्रक अडवला असता, चालकाने ट्रक न थांबवता पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ट्रक थांबत नसल्याचे बघून नाकाबंदीवरील एका अधिकाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून ट्रकच्या दिशेने गोळीबार केला असता, एक गोळी ट्रकला लागून अधिका-याच्या दिशेने परतून आली व त्यात अधिकारी जखमी झाले. दरम्यान सुपारी चोरट्यांनी तेथून ट्रकसह पोबारा केला होता.

पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न

या सुपारी चोरांचा शोध घेणाऱ्या भायंदर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना हे चोरटे मुलुंड पश्चिम मुलुंड कॉलनी या ठिकाणी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. मंगळवारी दुपारी भायंदर पोलिसांनी मुलुंड पोलिसांची मदत घेऊन मुलुंड कॉलनी परिसरात सापळा रचला होता. पोलिस पकडण्यासाठी आल्याचे कळताच या चोरांनी तलवार, चॉपर या शस्त्रांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचाः ‘गंगुबाई काठियावाडी’ पुन्हा वादात! मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल)

तिघांवर गुन्हा दाखल

दरम्यान, पोलिस पथकातील एका अधिकाऱ्याने हवेत गोळीबार करून त्यांचा हा हल्ला परतून लावत तिघांना शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.