…आणि आयुक्त व सहआयुक्त बनले ‘मियां-बेगम’… काय झाले पुढे? वाचा…

सिनेमात हे सगळं बघताना थ्रिलिंग वाटतं. पण प्रत्यक्षात ख-या पोलिसांनी असं केलं तर?? वाटेल की नाही कुछ तो गडबड हैं? पण गडबड नाही गड्यांनो, ही खरी गोष्ट आहे.

मित्रांनो ही गोष्ट वाचल्यानंतर तुम्हाला एखाद्या सिनेमा बघितल्याचा फिल येईल. सिनेमात आपण आजवर अनेक डिटेक्टिव(जासूस) पोलिस ऑफिसर बघितले आहेत. जे गुन्हेगारांची जिरवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. चोरांना अद्दल घडवण्यासाठी हे सिनेमातले पोलिस, काय वाट्टेल ते करायला तयार असतात. मग कधी एफआयआर फाडून गुंडालाच थोबडाव, कधी वेशांतर कर असे अनेक पर्याय ते आजमावतात. कारण एकदा का त्यांनी कमिटमेंट केली, की ते आपल्या तिर्थरुपांचंही ऐकत नाहीत. त्यांची एकदा का सटकली, की त्यांच्यातला रावडी सिंघम जागा झालाच म्हणून समजा. पण हे सगळं सिनेमात बघताना थ्रिलिंग वाटतं. पण प्रत्यक्षात ख-या पोलिसांनी असं केलं तर?? वाटेल की नाही कुछ तो गडबड हैं? पण गडबड नाही गड्यांनो, ही खरी गोष्ट आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या लीला केल्या आहेत.

आयुक्तांचा फिल्मी अंदाज

रमजान मास सुरू असताना, गुरुवारी रात्री पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एका मुस्लिम व्यक्तीचा वेश परिधान करुन हिंजवडी, वाकड, पिंपरी पोलिस ठाण्यावर अचानक धाड टाकली. तर त्यांच्यासोबत त्यांच्या बेगमची भूमिका वठवली ती सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी. यावेळी कृष्ण प्रकाश यांनी खोटी दाढी, केसांना मेहंदी, पायात स्टायलिश शूज, जिन्स पॅंट आणि डोक्यावर मुस्लिम टोपी, असे एखाद्या मियांप्रमाणे अगदी हुबेहुब वेशांतर केले होते. हा दौरा करताना त्यांनी एका खासगी गाडीचा वापर केला. इतकंच नाही तर त्यांनी एकदम फिल्मी डायलॉगबाजी देखील केली.

पोलिस ठाण्यात वेशांतर केलेले आयुक्त पोहोचले आणि…

‘आम्ही आमच्या बेगमसोबत जेवायला चाललो होतो. पण अचानक काही गुंड आले आणि त्यांनी माझ्या बेगमची छेड काढली. माझ्या बेगमच्या हातून त्यांनी किंमती वस्तू हिसकावून घेतल्या. आम्ही थांबवायचा प्रयत्न केला, पण ते पळून गेले. आमची तक्रार नोंदवून घ्या’, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. हिंजवडी आणि वाकड येथील पोलिस कर्मचा-यांनी याची चौकशी करत एफआयआर दाखल करायला घेतली. तेव्हा कृष्ण प्रकाश यांनी आपले खरे रुप त्यांना दाखवले. तेव्हा मात्र सगळं पोलिस स्टेशन त्या दोघांकडे आवासून बघायला लागले. त्या गडबडीत त्यांना आयुक्तांना सलाम ठोकण्याचीही शुद्ध राहिली नाही.

पिंपरी पोलिस ठाण्यात काय आला अनुभव?

याच वेशात हे मियां-बेगम पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाले. पण यावेळी त्यांची स्क्रिप्ट जरा वेगळी होती. ‘आमच्या घरातील सदस्याला कोरोना झाला आहे. आम्हाला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे आहे. अॅंम्ब्युलन्सवाले जास्त पैसे मागत आहेत. गरजवंतांची अडवणूक करत आहेत. तक्रार दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करा’, अशी मागणी त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात केली. पण तेथील पोलिस कर्मचा-यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच हे आमचे काम नाही, असे सांगत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. पण आयुक्तांनी वेशांतराचा नकाब दूर केल्यावर मात्र, त्यांची पाचावर धारण बसली. आयुक्तांनी हिंजवडी आणि वाकड पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांच्या कामाचे कौतुक केले. पण पिंपरी येथील प्रकारामुळे ते नाराज झाले.

काय होते कारण?

पोलिस तक्रारकर्त्यांसोबत कसे वागतात, पोलिस नागरिकांच्या तक्रारी नीट ऐकून घेतात की नाही, रात्री पोलिस ठाण्यातील कर्मचारी झोपा तर काढत नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी अशी वेश बदलून धाड टाकण्यात आल्याचे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. हे धाडसत्र यापुढेही सुरू राहील असेही त्यांनी सांगितले. ज्या पोलिस ठाण्यांत गैरव्यवहार आढळून येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शहरातील गुन्हे रोखणे हे आमचे ध्येय्य आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस सदैव तत्पर असणार आहेत. कृष्ण प्रकाश यांच्याकडे ‘चुकीला माफी नाही’… आजवर त्यांनी अनेक पोलिस निरीक्षक आणि कर्मचा-यांना कर्तव्यात कसूर केल्याने निलंबित केले आहे. अनेक गुंड त्यांच्या रडारवर आले आहेत आणि त्यांना कृष्ण प्रकाश यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here