परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… गृहमंत्र्यांवर केले धक्कादायक आरोप!

परमबीर सिंग यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडले आहे.

94

नुकत्याच मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन पायउतार झालेल्या परमबीर सिंग यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडले आहे. राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत आरोप केले आहेत. सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले असल्याचा खळबळजनक आरोप या पत्रात परमबीर सिंग यांनी केला आहे.

मुख्यमंत्री राजीनामा घेणार का?

गेल्या काही महिन्यांतील एकूणच राजकीय परिस्थिती आरोपांमुळे ढवळून निघाली असताना, आता राज्याच्या सेवेतील प्रशासकीय अधिका-यांनी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर अशा प्रकारचे गंभीर आरोप करणं, ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार, अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचाः आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण! ट्वीट करत दिली माहिती)

काय आहे पत्रात?

गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन प्रभारी सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ज्ञानेश्वर या शासकीय निवासस्थानी गेल्या काही महिन्यांत वारंवार बोलावून घेतले. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी गृहमंत्री आणि वाझे यांच्यात झाल्या. या भेटीत अनिल देशमुख यांनी वाझे यांना वसुली करण्याचे टार्गेट दिले होते. दर महिन्याला किमान १०० कोटी रुपये वसूल करुन द्यावेत असे देशमुखांनी वाझेंना सांगितले असल्याचे या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. मुंबईतील १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी वाझे यांना दिले असल्याचे, या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मोठ्या गौप्यस्फोटाने गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत.

गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले

परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अशाप्रकारचे आरोप आपल्यावर केले असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. तसेच मुकेश अंबानी प्रकरणाचे धागेदोरे हे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता असल्याने पुढील कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी हे आरोप परमबीर सिंग यांनी केले असल्याचे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

राजीनाम्याची मागणी

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परमबीर सिंग हे सध्या गृह विभागाच्या होम गार्ड युनिटचे प्रमुख आहेत. तसेच ते माजी मुंबई पोलिस आयुक्त सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून गृहमंत्र्यांवर आरोप करण्यात आला असल्याने विरोधकांनी आता ठाकरे सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी मुंबई आयुक्त पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे आरोप करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे, पण त्यापूर्वी अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्वाक्षरी नसलेले पत्र- मुख्यमंत्री कार्यालय करणार तपासणी

हे पत्र ४ वाजून ३७ मिनिटांनी मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ईमेलवर पाठवण्यात आले होते. पण हे पत्र स्वाक्षरी नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पत्रामागची सत्यता तपासण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परमबीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.