ठाणे मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग रक्षक गूढरित्या बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तुरुंग शिपायाने नुकताच तुरुंग अधीक्षक यांचा भ्रष्टाचाराचा एक व्हिडिओ तयार करून व्हायरल केला होता. त्यानंतर तुरुंग रक्षक अशोक पल्लेवाड अचानक बेपत्ता झाल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे.
पोलीस अधीक्षकांचा भ्रष्टाचार उघड करणारे तुरुंग शिपाई बेपत्ता
अशोक पल्लेवाड हे ठाणे मध्यवर्ती कारागृहात तुरुंग रक्षक म्हणून कार्यरत आहेत. आठवड्याभरापूर्वी पल्लेवाड यांनी मोबाईलवर एक व्हिडिओ तयार करून कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, हा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे अहिरराव हे पल्लेवाड यांच्यावर संतापले होते.
( हेही वाचा : वाघाच्या जंगलावर शिकाऱ्यांची नजर)
शनिवारी सकाळी अशोक पल्लेवाड हे घरातून कारागृहात कामावर जाण्यासाठी निघाले होते, त्यानंतर ते परतलेच नाही. या प्रकरणी पल्लेवाड यांची पत्नी ममता पल्लेवाड यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात २२मे रोजी हरवल्याची तक्रार दिली आहे. ठाणे नगर पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अशोक पल्लेवाड हे कल्याण पूर्वेतील तीसगाव येथे पत्नीसह राहत आहेत, २२ मे सायंकाळ पासून त्यांचा मोबाईल फोन बंद असून त्यांची कारागृहात तसेच नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली मात्र ते कुठेच सापडले नाहीत. त्यांची पत्नी ममता यांनी ही माहिती ठाणे नगर पोलिसांना दिली आहे.
व्हायरल व्हिडीओ नंतर अहिरराव हे अशोक पल्लेवाड यांच्यावर नाराज होते, त्यानंतर अचानक अशोक पल्लेवाड यांच्या गुढरीत्या गायब होण्यामागे हे तर कारण नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Join Our WhatsApp Community