वरळी कोळीवाड्यात पोलीस तैनात, कोळीबांधव संतापले

कोस्टलच्या कामाला तीन दिवसांची स्थगिती

मुंबई वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांना कोस्टल रोडच्या बांधकामामुळे समुद्रात मासेमारीसाठी अडथळा निर्माण होऊ लागल्यामुळे गेल्या महिन्यापासून मुंबई महापालिका व स्थानिक कोळी बांधव यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. कोस्टल रोडच्या कामाला कोळीबांधवांकडून होणारा वाढता विरोध पाहता याठिकाणी पोलिस बळाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून कोळी बांधवांचे आंदोलन चिघळून टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला असून, यासाठी कोळीवाड्याला छावणीचे स्वरुप देण्यात आले. शनिवारी सकाळपासून याठिकाणी मोठ्यासंख्येने पोलिस तैनात झाले होते.

पालकमंत्र्यांची ग्वाही

शनिवार दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई महानगर पालिकेच्या सांगण्यावरूनच वरळी कोळीवाड्यात पोलिसांनी मोठा ताफा तैनात केला होता. सगळ्या प्रकारचे दबाव तंत्र संपले असल्याने आता पोलीस बळाचा वापर करण्याची हिंमत महानगरपालिकेकडून दाखवली जात असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी केला आहे. शनिवारी झालेल्या या प्रकाराची दखल मत्स्यव्यवसाय मंत्री आणि मुंबई शहर पालक मंत्री अस्लम शेख ह्यांनी घेतली. त्यांच्या पुढाकाराने महापालिकेमार्फत होऊ घातलेल्या पोलिसांची अवैध कारवाई थांबवण्यात आली आहे. त्यामुळे तांडेल यांनी मत्स्य व्यवसायमंत्र्यांचे आभार मानले. पुढील तीन दिवसांसाठी महापालिकेला हे काम स्थगित ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून सोमवार पर्यंत तोडगा काढला जाईल,अशी ग्वाही खुद्द शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली असल्याची माहिती तांडेल यांनी दिली आहे.

( हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांकडून वानखेडेंची पाठराखण, म्हणाले… )

कोस्टलच्या पिलरमधील अंतर तिप्पट

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार कोळी बांधवांचे जे आंदोलन दोन खांबामधील अंतर वाढवण्यावरून सुरु आहे, त्याबद्दल जर बोलायचे झाल्यास वरळी सागरी सेतू अर्थात, राजीव गांधी सागरी सेतू मार्गाच्या पिलरमधील अंतराच्या तुलनेत कोस्टल रोडच्या पिलरमधील अंतर तिप्पट आहे. सागरी सेतू मार्गाच्या पिलरमधील प्रत्यक्षात १७ मीटर एवढेच आहे. वरून जरी ३८ मीटर दिसत असले तरी पाण्याच्या खाली हे अंतर केवळ १७ मीटर आहे. त्यातुलनेत कोस्ट रोडच्या प्रकल्पाच्या पिलरमधील अंतर ६० मीटर असून पाण्याच्या खालीही हे अंतर ५६ मीटर एवढेच आहे. त्यामुळे सागरी सेतूच्या तुलनेत तिप्पट अंतर असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here