पोलिसांची वाहने व पेहराव बघून पळ काढणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी लढवलेली शक्कल यशस्वी ठरली. रिक्षा चालक आणि टेम्पो चालक बनून पोलिसांनी ईरानी वाडीत प्रवेश केला. यावेळी तीन सराईत गुन्हेगाराची नाकाबंदी करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये एका महिलेचा समावेश असून तपासात या तिघांविरुद्ध ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – साईसंस्थान विश्वस्त मंडळाला दिलासा नाहीच, त्रिसदस्यीय समितीच पाहणार संस्थानाचं कामकाज)
काबुली नौशाद अली जाफरी (५२) असे अटक करण्यात आलेला टोळीचा म्होरक्या आहे, व इतर दोघांपैकी महिला ही चोरलेले दागिने विकण्यासाठी या टोळीला मदत करणारी आहे. काबूल जाफरी याच्यावर मुंबईसह ठाणे जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक सोनसाखळी चोरी, पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्धांची फसवणूक करणे या सारखे गुन्हे दाखल आहे. मागील काही महिन्यांपासून जाफरी हा मुंबई पोलिसांच्या रडारवर आला होता. जाफरी हा कल्याण येथील आंबिवली ईरानी वाडीत राहण्यास आहे, ईरानी वाडीत मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोर, तसेच बोलबच्चन टोळीतील गुन्हेगार राहण्यास आहे. या गुन्हेगाराना पोलीस अटक करण्यासाठी गेल्यावर ईरानी वाडीतील महिला पुढे येऊन पोलिसांना अटकाव करून आरोपीला पळून जाण्यास मदत करीत असतात तर वेळ पडल्यास पोलिसांवर हल्ला देखील करतात.
मुंबई पोलिसांच्या रडारवर असलेला काबूल जाफरी हा आंबिवली ईरानी वाडीत असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली होती, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी योजना आखली. रिक्षा चालक आणि टेम्पो चालकाच्या वेशात पोलीस ईरानी वाडीच्या बाहेर थांबले. काही पोलीस वेशभूषा करून ईरानी वाडीत त्याचा शोध घेत असताना काबूल जाफरी हा आपल्या एका जोडीदार आणि एका महिलेसह ईरानी वाडीच्या बाहेर पडताच पोलिसांनी त्याला आवाज दिला व त्याला पळून जाण्याची संधी न देताच त्याला आणि त्याच्या सहकार्याला खाजगी वाहनात बसवून मुंबईत आणले.
मुंबईत आणून जाफरी व त्याच्या दोन्ही सहकार्यांना अटक करण्यात आली आहे. जाफरी याच्यावर मुंबईत ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून अनेक वेळा त्याला अटक देखील झाली. मात्र जामिनावर बाहेर येताच पुन्हा तो गुन्हे करीत होता. कोरोनाच्या काळात जामिनावर बाहेर पडल्यानंतर जाफरीने पुन्हा मुंबईत गुन्हे करण्यास सुरुवात केली होती, जेष्ठ नागरिकांना पोलीस असल्याची भीती दाखवून तर कधी बोलबच्चन देऊन त्याच्या जवळील मौल्यवान वस्तू काढून घेत असे, अशी माहिती समोर आली.
Join Our WhatsApp Community