एखादी घटना घडली की, त्या घटनेची सविस्तर माहिती घेऊन घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदार त्यानंतर कागदोपत्री काम आणि शेवटी घटनेचा तपास या सर्वातून सुटका करण्यासाठी मुंबई पोलिस ठाण्यांतील काही अधिकारी चोरी, पाकिटमारी सारखे गुन्हे दाखल न करता प्रमाणपत्रावर तक्रारदारची बोळवण करताना दिसत आहेत. पोलिसांच्या या आळशीपणाचा अनुभव मुंबईतील अनेक नागरिकांना येतच होता, मात्र याचा अनुभव पत्रकारांना देखील आलेला आहे.
तक्रारदाराकडेच होते प्रश्नांची सरबत्ती
मुंबई शहरासह उपनगरात दररोज शेकडो चोरी, पाकिटमारी, बॅग हिसकावणे यांसारखे गुन्हे घडत आहेत. परंतु पोलिसांकडून या सर्वच गुन्ह्यांची गंभीरतेने दखल घेतली जात नाही. मोबाईल चोरी अथवा पाकिटमारी झाली असेल, तर तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारला सर्वप्रथम पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागते. कुठे चोरी झाली, तुम्ही तिकडे कशाला गेला होतात, चोर कुठून आले, कसे आले, त्यांनी काय घातले होते, ते कुठल्या दिशेने पळून गेले या सर्व प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर स्टेशन हाऊस ऑफिसर(कर्तव्यावरील ठाणे अंमलदार) शेवटी तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे का ? असा प्रश्न विचारतो. मौल्यवान वस्तू चोरीला गेली असेल तर गुन्हा दाखल करुन घ्यायची प्रक्रिया सुरू होते.
(हेही वाचाः दांडी बहाद्दर पोलिसांसाठी आयुक्तांचा ‘हा’ मोठा निर्णय!)
तक्रार दाखल न करण्याचा देतात सल्ला
मात्र मोबाईल फोन चोरी, पाकिटमारी झाली असेल तर हा स्टेशन हाऊस अधिकारी तक्रारदाराचे ब्रेन वॉश करतो. कशाला गुन्हा दाखल करता तुमची वस्तू मिळवून देऊ, गुन्हा दाखल केल्यास पुन्हा चोरीची वस्तू परत घेण्यासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागेल. त्यापेक्षा तुम्हाला प्रमाणपत्र देतो आणि तुमचा मोबाईल फोन ट्रेसिंगला टाकतो. मिळल्यास तुम्हाला कळवतो, असे सांगून हरवल्याचे प्रमाणपत्र तक्रारदाराच्या हातात टेकवतो. त्यापूर्वी मात्र तक्रारदारकडून ‘मला गुन्हा दाखल करायचा नाही’, असा जबाब एका कागदावर लिहून घेतला जातो.
असा आहे अनुभव
घाटकोपर पूर्वेतील पंतनगर आणि दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन पत्रकारांनाही हा अनुभव आला आहे. घाटकोपर पूर्व रमाबाई नगर येथून बसमध्ये चढताना एका पत्रकाराच्या बॅगेतील पैशांचे पाकिट चोरट्यांनी लांबवले. याची तक्रार देण्यासाठी हे पत्रकार पंतनगर पोलिस ठाण्यात गेले असता, तेथील स्टेशन हाऊस अधिका-यांनी प्रथम त्यांना प्रमाणपत्र देण्याची भाषा केली. मात्र पत्रकाराने मला एफआयआर नोंदवायचा असल्याचे सांगितल्यानंतर या अधिकाऱ्याने नाईलाजाने गुन्हा दाखल करुन घेतला.
(हेही वाचाः मुलाच्या अंत्यविधीसाठी पैसे उसने घेतले! पण ते फेडता आले नाहीत म्हणून वडिलांनी…)
असे टेकवले हातात प्रमाणपत्र
दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील असा अनुभव एका डिजिटल मीडियाच्या महिला पत्रकाराला आला. रात्री कार्यालयातून घरी पायी जात असताना, शिवसेना भवन ते प्लाझा सिनेमा दरम्यान मोटरसायकल वरुन आलेल्या दोघांनी या महिला पत्रकाराची बॅग खेचून पळ काढला होता. ही महिला पत्रकाराने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता, स्टेशन हाऊस महिला अधिका-याने तिचे ब्रेन वॉश करुन तिच्याकडून एका पेपरवर मला गुन्हा दाखल करायचा नसल्याचे लिहून घेतले आणि तिला बॅग हरवल्याचे प्रमाणपत्र देऊन तिला रवाना केले होते. असाच अनुभव अनेक मुंबईकरांना येत आहे. याबाबत काही अधिका-यांशी चर्चा केली असता, ‘आम्ही कुणावरही गुन्हा दाखल न करण्यासाठी बळजबरी करत नाही. तक्रारदाराची गुन्हा दाखल करण्याची इच्छा नसेल आणि तिला केवळ प्रमाणपत्र हवे असेल, तर आम्ही प्रमाणपत्र देतो असे पोलिस अधिका-यांचे म्हणणे आहे.
यासाठी करतात टाळाटाळ
मात्र, एका वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिका-यांकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांनी ‘हा स्टेशन हाऊस अधिका-यांचा आळशीपणा आहे. एफआयआर घेताना कागदोपत्री कामे वाढतात त्यात वेळ जातो, त्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास करावा लागतो. त्यात आरोपी सापडला तर ठीक, नाहीतर तीन महिन्यांनी हा गुन्हा ‘ए समरी’ म्हणून न्यायालयात दाखल करावा लागतो. त्यावेळी गुन्ह्याच्या तपासासाठी काय प्रयत्न केले याचे पुरावे न्यायालयाला सादर करावे लागतात. या सर्व प्रक्रियेतून वाचण्यासाठी आजकालचे नवीन अधिकारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात, असे या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
(हेही वाचाः भरदिवसा नालासोपा-यात खुनखराबा…)
Join Our WhatsApp Community