मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडा टळला

148
पश्चिम उपनगरातील एका ज्वेलर्सच्या शॉपवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सशस्त्र टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीजवळून पोलिसांनी घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे. ऐन गणेशोत्सवात पोलीस व्यस्त असल्याचे बघून या टोळीने दरोड्याची योजना आखली होती, मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी त्यांची ही योजना हाणून पाडली.
इस्लाम अस्लम खान, राहुल चव्हाण, संदीप शिंदे, सलमान अन्सारी, राजेश वाघमारे आणि शोएब खान असे अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेली टोळी ही गोरेगाव पूर्व येथे राहणारी आहे.  या टोळीजवळून दिंडोशी पोलिसांनी एक रिक्षा, दरोड्यासाठी लागणारे साहित्य आणि शस्त्र जप्त केले आहेत. पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात असल्याचा फायदा घेत या टोळीने गोरेगाव पूर्व येथील एका ज्वेलर्स दुकानावर धाडसी दरोडा टाकण्याची योजना आखली होती. दरोडा टाकण्यासाठी ही टोळी जवळच्या बस थांब्याजवळ एकत्र येणार असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली होती.

गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात 

दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि. घार्गे यांच्या पथकाने साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी रात्री ही टोळी एका रिक्षातून आली व दरोड्याचा तयारीत असताना लपून बसलेल्या पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप टाकून तिघांना ताब्यात घेतले व इतर तिघे अंधारात पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

या टोळीच्या नावावर गंभीर गुन्ह्यांची नोंद 

ताब्यात घेण्यात आलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी एक रिक्षा, दरोड्यासाठी लागणारे साहित्य आणि काही शस्त्रे जप्त केली असून या टोळीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या टोळीवर खून,दरोडे, चोरी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिंडोशी पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऐन गणेशोत्सवात दरोडा टळला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.