Mumbai News: उंदराच्या ताब्यातून पोलिसांनी असे जप्त केले 10 तोळे सोने

95

मुंबईच्या दिंडोशी परिसरामध्ये पोलिसांनी चक्क एका उंदराच्या ताब्यातून तब्बल 10 तोळे सोने हस्तगत केले आहे.  मुंबईच्या आरे काॅलनीमध्ये राहणारी एक महिला आपले कर्ज फेडण्यासाठी बॅंकेमध्ये 10 तोळे दागिने घेऊन निघाली होती. त्यावेळी वाटेत दिसलेल्या भिकारी स्त्री आणि तिच्या मुलाला तिने आपल्याकडे असणारा वडापाव दिला. पण तो वडापाव भिकारी स्त्रीने कचराकुंडीत फेकला आणि त्याच पिशवीत सोन्याचे दागिने होते, ज्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे. सीसीटीव्ही कॅमे-याच्या फूटेजच्या मदतीने पोलिसांनी दागिन्यांची पिशवी कुठे आहे याचा शोध घेतला.

काय आहे नेमके प्रकरण 

दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरे काॅलनी परिसरात राहणा-या सुंदरी नावाच्या महिलेला आपल्या मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडायचे होते. त्यासाठी घरातील 10 तोळे सोन्याचे दागिने बॅंकेत गहाण ठेवायचे होते. सुंदरी या घरकाम करतात. कामावर गेल्यानंतर, त्यांना त्यांच्या मालकाने वडापाव खायला दिला. तिने तो वडापाव नकळत दागिने असलेल्या पिशवीत ठेवला आणि रस्त्याने जाताना तो वडापाव भिकारी स्त्री आणि तिच्या मुलाला खायला दिला आणि ती निघून गेली. त्यानंतर बॅंकेत गेल्यावर तिच्या लक्षात आले की, वडापाव दिलेल्या पिशवीतच सोन्याचे दागिने होते. तिने लगेच भिकारी स्त्री जिथे बसली होती त्या ठिकाणी धाव घेतली, पण ती स्त्री तिथे नव्हती. त्यानंतर सुंदरी यांनी तत्काळ दिंडोशी पोलिसांत याबाबत तक्रार केली.

( हेही वाचा: राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपला चर्चेची दारे खुली; संजय राऊतांचे विधान )

असे शोधले सोने 

दिंडोशी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख सुरज राऊत यांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला. अधिकारी सूरज राऊत यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती भिकारी निघून जाताना दिसली. पोलिसांनी महिलेला शोधून काढले असता, तिने सांगितले की तिने तो वडापाव पिशवीसह कच-याच्या डब्ब्यात फेकला. पोलिसांनी कच-याच्या ढिगा-यात पिशवी शोधण्यास सुरुवात केली, मात्र ती तिथे सापडली नाही. कचराकुंडीजवळ असलेला सीसीटीव्ही फुटेज तपासला असता, वडापाव खाण्यासाठी उंदराने पिशवी पळवल्याचे लक्षात आले. उंदराचा पाठलाग केला असता, तो उंदिर पिशवी घेऊन नाल्यात शिरला. त्यानंतर पोलिसांनी नाल्यात शोधाशोध करत, सोन्याचे दागिने असलेली पिशवी शोधून काढली आणि सुंदरी यांच्याकडे सुपुर्द केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.