शिवसेनेचे बंडखोर आमदार शोधण्याची जबाबदारी आता पोलिसांवर?

179

शिवसेना नेते, गटनेता, मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील ३५ आमदारांना घेऊन गुजरातला गेले. त्यामुळे शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदारांना घेऊन बंडखोरी केल्यामुळे सरकार अल्पमतात येऊन कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून आता शिवसेना नेतृत्व सर्व मार्गाने परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता बंडखोर आमदारांना शोधण्यासाठी पोलिसांना जबाबदारी देण्यात यावी, अशी विनंती स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी गृहमंत्र्यांना केली. त्यानुसार गृहमंत्र्यांनी पोलिसांना या बंडखोर आमदारांना शोधण्याची जबाबदारी दिली असल्याचे सूत्रांकडून समजते.

अकोल्यातील आमदार नितीन देशमुख हेही बंडखोर आमदारांसोबत आहेत. त्यांच्या पत्नीने आता त्यांच्या पतीचे अपहरण केल्याची पोलिसांत तक्रार केली आहे, त्याआधारे पोलिसांनी आता त्यांच्यासह अन्य गायब आमदारांचा शोध सुरू केल्याचे समजते. तसेच मुंबईसह राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील पोलीस दलाला गृहविभागाकडून सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांकडून मिळाली आहे, त्याच बरोबर कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून मुंबईसह राज्यभरातील शिवसेना आमदार यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

( हेही वाचा : 48 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची एकनाथ शिंदे पुनरावृत्ती करणार? शिंदेंच्या ट्वीटमुळे खळबळ)

पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या असून सोमवारी सायंकाळीच या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी सुरू झालेल्या आहेत. शिवसेनेचे मंत्री आणि ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. कुठल्याही क्षणी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहे. अशावेळी राज्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्याचा प्रयत्न गृहविभाग करीत आहे.

शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण

एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून त्याच बरोबर शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या घराबाहेर देखील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसून शिवसेनेला कोंडीत पकडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. यामुळे पोलीस विभागाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. याबाबत मुंबई पोलीस दलाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता राज्यातील एकंदर राजकीय घडामोडी बघून पोलीस बंदोबस्तात नेहमीपेक्षा वाढ करण्यात आलेली आहे, मात्र पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश अद्याप तरी आमच्यापर्यंत आलेले नाहीत त्याबाबत काहीही सांगता येणार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.