सायबर हल्लेखोरांनी अमरावती शहरातील दोन व्यक्तींच्या खात्यामधून ऑनलाइन पद्धतीने लंपास केलेल्या रकमेपैकी १ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम सायबर पोलिसांच्या तांत्रिक मेहनतीमुळे परत मिळाले आहेत. त्यामुळे संबधित व्यक्तींनी आयुक्तालयात जाऊन पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्यासह सायबर ठाण्याच्या अधिकारी, अंमलदारांचे आभार व्यक्त केले.
काय आहे नेमकं प्रकरण?
अमरावती शहरातील प्रभात कॉलनीमध्ये राहणारे ऋषिकेश रविंद्र गुल्हाने हे कंत्राटदार आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांना सिमेंट खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन एका सिमेंट कंपनीचा क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर संभाषण केले. सिमेंट पाठवतो, अशी बतावणी त्या क्रमांकावर समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने करुन गुल्हाने यांच्याकडून २ लाख ७५ हजार रुपये ऑनलाइन मागवून घेेतले. मात्र, ऋषिकेश गुल्हाने यांनी रक्कम पाठवूनही संबंधितांनी सिमेंटचा पुरवठा केला नाही. दरम्यान आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच गुल्हाने यांनी तत्काळ सायबर पोलिसांसोबत संपर्क साधला.
(हेही वाचा – 267 कोटींचे ऑक्सिजन प्लांट वेळेत पूर्ण करण्यात पालिका अपयशी!)
पोलिसांच्या प्रयत्नांना यश
सायबर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ तांत्रिक पद्धतीने तपास करुन गुल्हाने यांच्याकडून सायबर हल्लेखोरांनी उडवलेली रक्कम नेमकी कोणत्या प्लॅटफाॅर्मवरुन गेली आहे, त्यासाठी कोणकोणत्या बँकेतील खात्यांचा वापर करुन घेतला. ही माहिती काढली आणि रक्कम आहे, त्याच ठिकाणी गोठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे गुल्हाने यांचे १ लाख ७५ हजार रुपये थांबवून त्यांना परत मिळवून देण्यात यश मिळवले. तसेच चंद्रशेखर देशमुख यांचेही २० हजार रुपये सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत.
Join Our WhatsApp Community