पोलीस भरती – रनिंग चिप बदलणाऱ्या ८ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल

120
पोलीस भरतीसाठी आलेल्या ८ उमेदवारांनी धावण्याच्या चाचणीत जास्त गुण मिळवण्यासाठी पायाला लावलेल्या  ‘रनिंग चिप’ बदलल्याचा प्रकार मरोळ पोलीस मैदान या ठिकाणी समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात या आठ उमेदवारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले उमेदवार एकाच जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत नायगाव, कोळेकल्याण आणि मरोळ पोलीस कॅम्प या ठिकाणी पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू आहे. मैदानी चाचणीमध्ये सोळाशे मिटर धावणे आणि गोळा फेक ही चाचणी सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो तरुण या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेले आहे. पोलीस भरतीसाठी प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, यासाठी एका खाजगी कंपनीला काम देण्यात आले आहे.
धावण्याच्या चाचणीचे अंतर आणि वेळ मोजण्यासाठी उमेदवारांच्या दोन्ही पायांमध्ये ‘रनिंग चिप’ बँड बसवले जाते, उमेदवाराने किती वेळात धावण्याचे अंतर पूर्ण केले यांची नोंद होऊन त्यानुसार उमेदवारांना गुण दिले जात आहेत. ही अत्याधुनिक प्रणाली प्रथमच पोलीस भरतीत वापरण्यात आली आहे. अहमदनगर आणि नागपूर जिल्ह्यांतून मुंबईत  भरतीसाठी आलेल्या ८ उमेदवारांनी मात्र या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आव्हान दिले आहे. धावण्याच्या चाचणीत अधिक गुण मिळविण्यासाठी या आठ जणांनी १ मार्च रोजी झालेल्या मैदानी चाचणीत एकमेकांच्या पायातील रनिंग चिप बदलून अधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार चिप स्कॅन करताना हजर असलेल्या अधिका-यांच्या लक्षात आला, त्यांनी मैदानातील कॅमेरातील फुटेज तपासले असता या आठ उमेदवारांनी चिपमध्ये दाखवलेल्या कालावधीप्रमाणे धावण्याची चाचणी पूर्ण केली नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी या आठ ही जणांकडे चौकशी केली असता, त्यांनी चिप बदलल्याचे कबूल केले. मात्र, त्यांना चिप बदलण्याचे कुठून प्राप्त झाले याबाबत आठही जण काहीही माहिती देत नसल्याचे एका आधीका-याने सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.