आत्महत्या करण्यासाठी टेकडीवर गेलेल्या वकिलाला वाचवलं

153

फेसबुकवर आत्महत्येची पोस्ट टाकून नाशिक येथून मुंबईत आलेल्या एका वकिलाला घाटकोपर पोलिसांनी पवई टेकडीवरून ताब्यात घेतले आहे. या तरुण वकिलाचे समुपदेशन करण्यात आले असून त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

( हेही वाचा : गँगस्टर छोटा शकीलचा आवाज खरा नव्हता! सीआयडी तपासातून उघड )

असा घडला प्रकार

परमदेव अहिरराव असे या वकिलाचे नाव आहे. परमदेव हा नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे कुटुंबीयांसह राहत आहे. घाटकोपर पश्चिम गोळीबार रोड या ठिकाणी त्याचे नातलग राहण्यास आहे. कर्जबाजारी झालेला परमदेव हा कंटाळून मुंबईत नातलगांकडे निघून आला होता, घाटकोपर पश्चिम गोळीबार रोड येथे राहणाऱ्या नातलगांकडे मागील काही दिवसापासून तो राहण्यास होता. रविवारी दुपारी अचानक तो घरातून निघून गेला, त्यानंतर मात्र त्याने फेसबुकवर ‘ मी आत्महत्या करीत आहे’ अशी पोस्ट टाकली. अनेक मित्र मंडळी, नातलगांनी ती पोस्ट वाचल्यानंतर त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाईल हा बंद असल्यामुळे त्याचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर गोळीबार रोड येथे राहणाऱ्या नातलगांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

समुपदेशन करून कुटुंबीयांकडे सोपवले

पोलिसांनी तात्काळ परमदेव याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले असता पवई येथील एका टेकडीवर त्याचे शेवटचे लोकेशन मिळून आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर, पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी तात्काळ पोलीस पथकाला त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागावर पाठवले. पोलीस पथकाने पवईतील जंगल, टेकड्यावर त्याचा शोध घेत असता एका उंच टेकडीवरून परमदेव आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. पोलीस वेळ न दडवता त्याच्यापर्यत पोहचले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले व त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी परमदेव याचे समुपदेशन करून त्याला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले. कर्जबाजारी झाल्यामुळे परमदेव याने ही टोकाची भूमिका घेतली होती, मात्र आम्ही वेळीच त्याचे लोकेशन शोधून त्याचा शोध घेत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आगरकर यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.