टिपू सुलतानच्या नावाची पाटी काढायला पालकमंत्र्यांना कोणी रोखले?

110

मालाडमधील एका क्रीडांगणाला शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी टिपू सुलतान यांचे नाव दिल्यानंतर आता याविरोधात भाजप आणि बजरंग दलचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले आहेत. या क्रीडांगणाला टिपू सुलतान यांचे अधिकृत नाव दिले नसल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे ही अनधिकृतपणे लावलेली नावाची पाटी काढून टाकल्यानंतर सर्व वाद मिटला जाण्याची शक्यता असतानाही महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्यावतीने भाजपची उणीधुणी काढत एकप्रकारे पालकमंत्र्यांच्या कृतीचे आणि या नावाच्या पाटीचे समर्थन करताना दिसत आहे. त्यामुळे अनधिकृत नामफलक लावणारे काँग्रेसचे आमदार व मंत्री राहिले बाजूला, उलट यावरून शिवसेना विरुध्द भाजपमध्ये तलवारबाजीचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे ही पाटी काढायला उपनगराच्या पालकमंत्र्यांना नक्की कुणी रोखलेय? ते जिल्हाधिकाऱ्यांना सांगून ही पाटी काढत का नाही असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

( हेही वाचा : कचरा कुंडी बनलेले ‘ते’ पुरातन प्याऊ पुन्हा दादरकरांची तहान भागवणार! )

महापौरांनी स्पष्ट केली शिवसेनेची भूमिका

मालाडमधील एका क्रीडांगणाला टिपू सुलतानचे नाव दिल्यामुळे बुधवारी मालाडमध्ये भाजप व बजरंग दलाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. या टिपू सुलतान यांच्या नावाला होत असलेल्या विरोधामुळे ही पाटी त्वरीत काढून टाकण्यात यावी अशी मागणी होत असतानाच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना या क्रीडांगणाला टिपू सुलतान यांचे नाव दिलेले नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची मंजुरी दिलेली नसताना त्यावरून वाद करणे योग्य नाही. या क्रीडांगणाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. परंतु भाजपकडून त्यावर एक चकार शब्दही काढला जात असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे टिपू सुलतान क्रीडांगण म्हणून ते अधिकृत पटलावर नाही. त्यामुळे या मुद्दयावरून आंदोलन करत मुंबईला अशांत करायचे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवायचे हेच काम भाजप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी मुंबईकरांना अस्थिर करू नका असे सांगतानाच त्यांनी यापूर्वी मानखुर्द येथील रस्त्याला जे टिपू सुलतान यांचे नाव दिले त्याला अनुमोदक व सूचक हे भाजपचेच नगरसेवक होते, याचे कागदोपत्री पुरावेच महापौरांनी सादर केले. तसेच विधीमंडळातही युतीचे सरकार असताना असाच उल्लेख असलेली कागदपत्रेही दाखवली, जी तत्कालिन अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे यांनी मांडली होती.

भाजपचा आरोप

यावर भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांच्या या नामकरणावरून कोलांट्या उड्या मारणे सुरु असल्याचा आरोप केला. क्रुरकर्मा धर्मांध आणि हिंदुचा नरसंहार करणारा टिपू सुलतान यांच्या नावाऐवजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्यात येईल, असे सांगितले. परंतु महापौरांनी तसे केवळ न सांगता ते कृतीतून दाखवावे, असे सांगत त्यांनी महापौर या मुंबईकरांची आणि हिंदुंची दिशाभूल करत असल्याचाही आरोप केला. अप्रत्यक्षपणे नामकरणाला सहमती देत महापौरांची बदलेली भूमिका अनाकलनीय आहे. त्यामुळे नामकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे का? असा सवाल करत त्यांनी जर नामकरणच झालेले नाही तर अनधिकृत लावलेली पाटी काढून टाकण्यात यावी. यावर महापौरांनी काय कारवाई केली हे सांगणे अपेक्षित आहे. तसेच यापूर्वीचे जे नामकरणाचे प्रस्ताव मंजूर केले आहे, त्यांच्या इतिवृत्तांमध्ये खाडाखोड केल्याचाही आरोप भाजपने केला आहे.

उपनगराचे पालकमंत्री हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी जर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या तरी ही नावाची पाटी त्वरीत काढली जाऊ शकते. त्यामुळे महापौरांनी पुढाकार घेऊन आपल्या पक्षाचे नेते असलेल्या पालकमंत्र्यांना ही पाटी काढायला लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची विनंती का करत नाही असाही सवाल शिंदे यांनी केला असून केवळ तेथील आमदार हे पालकमंत्री आहेत त्यामुळे सरकारच्या विरोधात जाणार नाही, प्रसंगी कायदा सुव्यवस्था बिघडली तरी चालेल हीच शिवसेनेची भूमिका आहे का असा प्रश्नही शिंदे यांनी केला आहे.

( हेही वाचा : एसटी बंद, प्रवाशांचे हाल, खासगी वाहनधारक मात्र मालामाल! )

मग महापौर ते फेरविचाराचे प्रस्ताव का मंजूर करत नाही

एम पूर्व येथील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरु होऊन रफिनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजी नगर मार्ग क्रमांक४ ला शहीद टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या २७ डिसेंबर २०१३ च्या ठरावान्वये घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी महापौरांना २२ जुलै २०२१ रोजी पत्र दिल्याचे महापालिका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. याशिवाय अंधेरी पश्चिम येथील भवन्स महाविद्यालयापासून सुरु होऊन गिल्बर्ट हिलमार्गे सीडी बर्फिवाला मार्गाच्या नाक्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान मार्ग असे नामकरण करण्याचा महापालिकेचा २३ एप्रिल २००१ चा ठरावाचा निर्णयाचा फेरविचार करण्याबाबतही महापौरांना २३ जुलै २०२१ रोजी पत्र दिले आहे. दोन्ही पत्र महापौरांना देऊन सात महिने उलटत आले तरी महापालिकेच्या पटलावर घेऊन त्यांना मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे महापौर या नामकरणाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी का देत नाही असाही सवाल प्रभाकर शिंदे यांनी केला आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.