Yakub Memon Controversy: दोन वर्षांपासून तक्रारीवर कारवाई नाही, दहशतवादी मेमनला कोणाचे वरदान?

दहशतवादी याकूब मेमन कबर वादात याकुबच्या भावाने कुख्यात गुंड टायगर मेमनच्या नावाने मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींना धमकी दिली होती. या धमकीची तक्रार विश्वस्त जलील नवरंगे यांनी 2020 मध्ये पोलीस ठाण्यात केली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. मुंबई पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करणाऱे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाकडे लक्ष का दिले नाही, असा प्रश्न सध्या सत्ताधा-यांकडून विचारला जात आहे.

ट्रस्टींनी माध्यमांना दिली माहिती

बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींनी मीडियाला सांगितले की, 2020 मध्ये याकूब मेमनचे नातेवाईक रऊफ मेमन याने याकुबच्या कबरीच्या सजावटीसाठी त्यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी तो तयार नसताना, रऊफने टायगर मेमनच्या नावाने धमकी दिली होती. त्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखांना लेखी तक्रार दिली होती. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर, त्याला बडा कब्रीस्तानमध्ये दफन करण्यात आले होते.

( हेही वाचा: Yakub Memon: मेमनच्या कथित नातेवाईकांसोबत किशोरी पेडणेकरांचा व्हिडिओ व्हायरल; आरोप – प्रत्यारोप सुरु )

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता भाजप-शिवसेना सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या तपासात कबरीच्या सजावटीसाठी ट्रस्टीला टायगर मेमनच्या नावाने धमकावण्यात आल्याचे समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here