मुंबईतील विविध ठिकाणी २ ऑक्टोबरपासून पॉलिक्लिनिक सुरु; सकाळी सात ते रात्री दहापर्यंत मिळणार उपचार सेवा

175

मुंबईत येत्या २ ऑक्टोबर पासून प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये टप्पेनिहाय पद्धतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक आणि दवाखाने यांची सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या महानगरपालिकेचे दवाखाने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत कार्यरत असतात. या वेळे व्यतिरिक्त ५० ठिकाणी सुरु होणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक हे सकाळी ७ ते दुपारी २, दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत अथवा रुग्णसंख्या अधिक असल्यास दोन्ही सत्रात कार्यरत असतील असे महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

( हेही वाचा : आयआयटीमध्ये उभारणार DRDO ची समन्वय केंद्रे)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे अंधेरी परिसरात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणासाठी करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध स्तरिय प्रयत्न करीत असून याच प्रयत्नांचा भाग म्हणून विविध पायाभूत बाबींचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासोबतच सह आयुक्त तथा उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित वैद्यकीय कर्मचा-यांसाठी सक्षमीकरण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन करतान सांगितले. यावेळी बोलतांना अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या दवाखान्यांप्रमाणेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिकद्वारे देखील असंसर्गजन्य रोगांचे तपासणी व प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब व मधुमेह याबाबतची तपासणी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा-सुविधांचे लोकसंख्या आधारित विश्लेषण हे विभाग स्तरिय पद्धतीने केले जाणार आहे. तसेच आरोग्य स्वयंसेविका (CHV) आणि आशा सेविका यांच्याद्वारे गृहभेटी देण्यात येऊन रक्तदाब (Hypertension) विषयक माहिती गोळा करुन असंसर्गजन्य रोग प्रतिबंध (एनसीडी) कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विभाग स्तरावरील आवश्यक त्या सेवा-सुविधांसह पोर्टा केबिन उभारणी करण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि अभियंते यांना यापूर्वीच निर्देशित करण्यात आले आहे. तसेच आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिमंडळीय उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावर नियमितपणे कार्यक्रमांचे पुनरावलोकन (Review) करण्याचेही निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी याप्रसंगी दिले.

रुग्णसंख्या अधिक असल्यास दोन्ही सत्रात कार्यरत

याप्रसंगी बोलताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, येत्या २ ऑक्टोबर पासून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये टप्पेनिहाय पद्धतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक आणि दवाखाने यांची सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. सध्या महानगरपालिकेचे दवाखाने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत कार्यरत असतात. या वेळे व्यतिरिक्त ५० ठिकाणी सुरु होणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक हे सकाळी ७ ते दुपारी २, दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत अथवा रुग्णसंख्या अधिक असल्यास दोन्ही सत्रात कार्यरत असतील असे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक आरोग्य संघटना व मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे मुंबईमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार साधारणपणे ३४ टक्के रक्तदाबाचे रुग्ण आणि १९ टक्के मधुमेहाचे रुग्ण हे १८ ते ६९ या वयोगटातील असल्याची माहिती सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली . याच कार्यशाळेदरम्यान बोलताना आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे समीर कंवर यांनी प्राथमिक आरोग्य सेवेतील डिजिटलायझेशनचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी डॉ. रामस्वामी यांनी क्षयरोग रुग्ण आणि क्षयरोग नियंत्रण याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘प्रधान मंत्री क्षयरोग मुक्त अभियान’ अंतर्गत समावेश असलेल्या विविध बाबींची अधिकाधिक परिणामकारक अंमलबजावणी करावी. तर याच कार्यशाळेदरम्यान विश फाऊंडेशनचे डॉ. राजेश सिंह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. अमोल वानखेडे यांनीही उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, परिमंडळीय सहआयुक्त तसेच उपायुक्त विजय बालमवार, विश्वास शंकरवार, रमाकांत बिरादर, भाग्यश्री कापसे, देवीदास क्षिरसागर आणि विभाग स्तरिय सहाय्यक आयुक्त, मार्गदर्शक डॉ. रामस्वामी, माजी महा संचालक (आरोग्य सेवा) डॉ. सुभाष साळुंखे, विश फाऊंडेशन या संस्थेचे डॉ. राजेश सिंह व इतर प्रतिनिधी, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. अमोल वानखेडे, डिजिटल हेल्थ मिशनचे उप संचालक डॉ. समीर कंवर व इतर प्रतिनिधी, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, पाथ या संस्थेचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.