जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी, (३ मे) संरक्षण दलाच्या २ वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर ४ जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. दरम्यान रविवारी दुसऱ्या दिवशीही या प्रकरणातील दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. सुरक्षा दल दहशतवाद्यांना २० किलोमीटरहून अधिक परिघात शोधण्यात व्यस्त आहेत.
या शोधमोहिमेत हेलिकॉप्टर, ड्रोन, श्वान पथक आणि पॅरा कमांडो तैनात करण्यात आले आहेत. सहा जणांपेक्षा जास्त जणांना संशयाच्या अधारे चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, AK असॉल्ट रायफल्स व्यतिरिक्त दहशतवाद्यांनी जास्तीत जास्त जीवितहानी करण्यासाठी यूएस-निर्मित M4 कर्बाइन्स आणि स्टील बुलेटचादेखील वापर केला होता.
दरम्यान, हवाई दलाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये शहीद कॉर्पोरल विकी पहाडे यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि भारतीय हवाई दलाच्या सर्व जवानांनी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही शोकग्रस्तांप्रती तीव्र शोक व्यक्त करत लिहिले.
(हेही वाचा – Nagpur Earthquake: सलग तिसऱ्या दिवशीही नागपुरात भूकंपाचे सौम्य धक्के, कोणत्या परिसरात हादऱ्यांची नोंद?)
संयुक्त कारवाई सुरू…
हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जंगलात लपले. जम्मू केआयजीपी आनंद जैन आणि लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शाहसीतार, गुरसाई, सनई आणि शेंदरा टॉपसह अनेक भागात लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. पूंछ आणि नजीकच्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. २००३ ते २०२१ या काळात या भागातील दहशतवाद संपुष्टात आला.
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा हात
हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा हात असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात ३ ते ४ दहशतवादी सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड अबु हमजा असल्याची माहिती समोर आली असून तो सीमावर्ती जिल्ह्यात राजौरी-पुंछमध्ये दहशतवादी कारवाया करत आहे. या हल्ल्यात स्टीलच्या गोळ्यांचा वापर करण्यात आला, मात्र अद्याप कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतली नाही.
हेही पहा –