तब्बल २० महिन्यांनंतर होणार महापालिकेची प्रत्यक्ष सभा?

109

कोविडच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मार्च २०२० पासून मुंबई महापालिकेच्या प्रत्यक्ष सभा बंद झाल्या असून, तेव्हापासून आजवर केवळ ऑनलाईन महापालिका सभा घेतल्या जात आहेत. मात्र, या ऑनलाईन सभेमध्ये नगरसेवकांना विभागातील समस्या मांडता येत नसल्याने प्रत्येक नगरसेवक आता प्रत्यक्ष सभेसाठी आतुर झाला आहे. त्यामुळे नगरसेवकांना आता जास्त दिवस ऑनलाईन सभेत सहभागी व्हावे लागणार नाही. येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या महापालिकेच्या प्रत्यक्ष सभेला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गटनेत्यांशी चर्चा केली जाणार असून त्यानंतर प्रत्यक्ष सभेचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे तसे झाल्यास तब्बल २० महिन्यांनंतर महापालिकेचे नगरसेवक एकमेकांच्या संपर्कात येऊन प्रत्यक्ष सभेत सहभागी होणार आहे.

पहिली सभा येत्या सोमवारी

कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावानंतर मार्च २०२०पासून राज्य शासनाने महापालिकेच्या सभा व सर्व समित्यांच्या सभा प्रत्यक्ष घेण्यात बंदी घातली होती. त्यानंतर महापालिकेत व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे महापालिका सभा आणि वैधानिकसह विशेष समित्यांचे कामकाज घेण्यात येत होते. मात्र ऑक्टोबर २०२०पासून महापालिका समित्यांच्या बैठका ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्षात घेण्यास सुरुवात केली. परंतु फेब्रुवारी २०२१पासून पुन्हा कोविडच्या आजाराचा भार वाढल्यानंतर प्रत्यक्ष बैठका रद्द करून पुन्हा ऑनलाईन सभा घेण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून महापालिकेच्या विविध समित्यांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मागील महिन्यापासून स्थायी समितीच्या बैठका प्रत्यक्ष घेण्यास सुरुवात केली आहे.परंतु महापालिकेच्या सभा या ऑनलाईनच सुरु होत्या. त्या प्रत्यक्ष घेण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून होत असतानाही महापालिकेच्या सभा प्रत्यक्ष घेतल्या गेल्या नव्हत्या. पण आता नोव्हेंबर महिन्याची पहिली सभा ही येत्या सोमवारी २२ तारखेला निश्चित करण्यात आली आहे.

गुरुवारी निर्णय घेतला जाण्याची शक्यता

नोव्हेंबर महिन्याची महापालिकेची ही पहिली सभा व्हिडीओ कॉन्फरन्सीऐवजी प्रत्यक्ष होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत सध्या कोविड रुग्णांची संख्या बऱ्याच प्रकरणात नियंत्रणात आली असून, प्रत्येक नगरसेवकांसह महापालिका अधिकाऱ्यांनी लसींच्या दोन मात्रा घेतलेल्या आहेत.  त्यामुळे सभागृहात प्रत्यक्ष सभा घेण्यास काहीच हरकत नसल्याचे मत तयार झाले आहे. सध्या स्थायी समितीची बैठक महापालिका सभागृहात सामाजिक अंतर राखून घेतली जाते. परंतु महापालिकेत २२७ अधिक ५ अशाप्रकारे २३२ नगरसेवक संख्या आहे. महापालिका सभागृहाची एकूण क्षमता २४७ सदस्यांची असून महापालिका सभागृहात अधिकारी व सभागृहाच्या कामकाजाचे वृत्तांकन करणारे पत्रकार आदींना बसण्यास जागा आधीच अपुरी पडत आहे. महापालिकेच्या सभागृहात या सभा घ्याव्यात की, अन्य ठिकाणी किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे सभा घेतल्या जाव्यात यासंदर्भात गुरुवारी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत प्रत्यक्ष सभेबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.