अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर भारतात गुप्तचर खात्याकडून हाय अलर्ट! भारतात हल्ल्याची शक्यता

अमेरिकेकडून करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरी याचा खात्मा झाला. त्यामुळे अमेकिरेने 9/11 च्या हल्ल्याचा बदला पूर्ण केला असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे. पण यानंतर आता भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच सावधगिरी म्हणून गुप्तचर खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुप्तचर खात्याकडून अलर्ट

अमेरिकेने अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला करत अल-जवाहिरीला ठार केले. पण अल-कायदाशी संबंधित असलेल्या संघटनांकडून भारतात दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. त्याचमुळे अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर गुप्तचर खात्याने अलर्ट जारी केला आहे. अल-कायदाने आता आपल्या नव्या उत्तराधिका-याची देखील निवड केली आहे. त्यामुळे जेव्हा-जेव्हा अल-कायदाचा नवीन उत्तराधिकारी नियुक्त करण्यात येतो तेव्हा अल-कायदाने जगभरात विविध ठिकाणी हल्ले घडवून आणल्याचे दिसून आले आहे.

या संघटना सक्रिय होण्याची शक्यता

लादेनच्या मृत्यूनंतर सुद्धा अल-कायदाकडून विविध दूतावासांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे जवाहिरीच्या मृत्यूनंतरही अशाच प्रकारचे हल्ले केले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल-कायदा ही संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांना देखील मदत करत असल्यामुळे या संघटना देखील आता सक्रिय होण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच गुप्तचर यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे.

जवाहिरी होता मोस्ट वॉन्टेड

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे अल-कायदाचा तत्कालीन म्होरक्या ओसामा बिन लादेन आणि अल-जवाहिरी हे दोघे मास्टर माइंड होते. 2011 साली अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतर अल-जवाहिरी याने अल-कायदाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. जवाहिरी हा मोस्ट वॉन्टेड टेररिस्टच्या यादीत देखील होता. त्यामुळेच अमेरिकेने आता अल-जवाहिरीला कारवाई करत ठार केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here