चला…आता ‘प्रभाग आरक्षण’ सोडत दिवाळीनंतरच!

219

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग आरक्षणाची उत्सुकता आता सर्वच विद्यमान नगरसेवक आणि राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना लागली आहे. त्यामुळे प्रभाग आरक्षणाची एकच चर्चा सध्या सुरु असून कोणत्याही विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची दिवाळी खराब होणार नाही याची खबरदारी निवडणूक विभाग आणि सरकारच्या माध्यमातून घेतली जात आहे. त्यामुळे प्रभाग आरक्षणाची लॉटरी सोडत आता दिवाळीनंतरच होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२२ च्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहेत. शहरासह राज्यात आणि देशात कोविड १९चे संकट समोर उभे आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा आहे. ही निवडणूक नियोजित वेळेत पार पाडण्यासाठी महापालिका निवडणूक विभाग हा राज्य निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार कामाला लागला आहे. मात्र, ही निवडणूक फेब्रुवारी २०१२ होणार असल्याने ऑक्टोबर महिन्यात प्रभाग आरक्षण जाहीर होणे अपेक्षित मानले जात होते. परंतु पितृपक्ष आणि त्यानंतर नवरात्र आदींमुळे हे प्रभाग आरक्षण जाहीर झाले नाही. मात्र, याबाबत सोशल मिडियावरून चुकीचे वृत्त व्हायरल झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात प्रभाग आरक्षण सोडत कधी जाहीर होणार असा प्रश्न प्रत्येक नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार करताना दिसत आहे.

(हेही वाचा-अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता दोन्ही लस आवश्यक!)

प्रभाग आरक्षण सोडत ही दिवाळीनंतरच

सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दर पाच वर्षांनी प्रभाग आरक्षण सोडत तर दर दहा वर्षांनी प्रभाग रचना केली जाते. परंतु मागील सार्वत्रिक निवडणुकीत केलेल्या प्रभाग रचनेबाबत काही विरोधी पक्षांनी काही आक्षेप नोंदवल्याने त्या संबंधित प्रभागांची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रभाग फेररचनेचे काम काम सुरु असून आतापर्यंत निवडणूक विभागाने तयार केलेल्या अहवालानंतर उपायुक्त सुनील धामणे आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्थळ पाहणी केली आहे. त्यामुळे याबाबतची कार्यवाही सुरु असून त्यामुळे प्रभार आरक्षण सोडत काढण्यास काही विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता प्रभाग आरक्षण सोडत ही दिवाळीनंतरच काढली जाण्याची दाट शक्यता निवडणूक विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

याद्यांमध्ये सुधारणा करण्यास केंद्र बनवण्यात येणार 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, धारावीमध्ये दोन तर भायखळा येथील दोन प्रभागांची फेररचना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यासर्व प्रभागांमधील मतदान केंद्रांची अदला-बदल तसेच इतर प्रभागांमध्ये समाविष्ठ झाले आहेत. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या सुधारीत करण्याचाही निर्णय घेतलेला असून ज्या मतदारांच्या नावात किंवा वयात सुधारणा करावयाच्या असल्यास त्यांना या सुधारणा करता याव्यात यासाठीही केंद्र बनवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.