महाराष्ट्रातील तीन महिलांना, नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महिलांसाठी विशेषत: समाजातील मागास आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून प्रख्यात महिला आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी केन्द्र सरकारने हा पुरस्कार दिला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन, येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकूण 29 उल्लेखनीय व्यक्तींना आज पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील तीन पुरस्कार विजेते आहेत:
-
सायली नंदकिशोर आगवणे (नारी शक्ती पुरस्कार 2020)
सायली नंदकिशोर आगवणे यांना कठीण परिस्थितीतही भारतीय शास्त्रीय नृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नारी शक्ती पुरस्कार 2020 देण्यात आला आहे. जन्मजात डाऊन सिंड्रोम हा आजार असलेल्या आगवणे यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून कथ्थक शिकण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून त्यांनी 100 हून अधिक नृत्य कार्यक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे. ‘डाउन सिंड्रोम’ ग्रस्त सुमारे 50 मुलांना त्या नृत्य शिकवतात. यापूर्वी, राज्य सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने त्यांना ‘द बेस्ट इंडिव्हिज्युअल पर्सन विथ डिसएबिलिटी (महिला) – 2012’ श्रेणी अंतर्गत ‘स्पंदन राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.
-
कमल कुंभार (2021 साठी नारी शक्ती पुरस्कार)
कमल कुंभार या सामाजिक उद्योजिका उद्योजिका असून त्यांना पशुपालन क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी विशेष योगदानाबद्दल नारी शक्ती पुरस्कार 2021 मिळाला आहे. त्यांनी 5,000 हून अधिक महिलांना सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली आहे. त्या ‘कमल पोल्ट्री अँड एकता सखी प्रोड्युसर कंपनी’च्या संस्थापक आहेत. या माध्यमातून त्यांनी दुष्काळी उस्मानाबाद भागातील 3,000 हून अधिक महिलांना मदत केली आहे. त्यांनी कोंबड्याच्या प्रमुख प्रजातींसाठी (चिकन) पोल्ट्री कार्यपद्धतीही स्थापित केली आहेत.
त्यांना पुण्यातील स्वयं शिक्षण प्रयोगाच्या स्वयंसेवी संस्थेच्या स्वच्छ उर्जा कार्यक्रमा अंतर्गत ‘वुमन इन क्लीन एनर्जी प्रोग्रॅम’ मध्ये ‘ऊर्जा सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांनी 3,000 हून अधिक घरे उजळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापूर्वी निती आयोगाने त्यांना 2017 मध्ये वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना ‘सीआयआय फाउंडेशन वुमन एक्झम्प्लर अवॉर्ड’नेही सन्मानित करण्यात आले आहे.
-
वनिता जगदेव बोराडे (नारी शक्ती पुरस्कार 2020)
वनिता जगदेव बोराडे यांना त्यांच्या वन्यजीव संवर्धनासाठी विशेषत: सापांची सुटका करणे आणि जनजागृतीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी नारी शक्ती पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. त्या पहिल्या महिला सर्पमित्र आहेत. त्यांनी आतापर्यंत 50,000 हून अधिक सापांचे प्राण वाचवले असून सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडले आहे. म्हणूनच त्या सर्पमित्र म्हणून ओळखल्या जातात. भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट जारी करून त्यांचा गौरव केला आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. निसर्ग आणि वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन’च्या त्या संस्थापक आहेत.
Join Our WhatsApp Community