मुंबई महानगरपालिकेतील लिपिकीय आणि लेखा परीक्षकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध तथा नियमित पदोन्नतीसाठी असलेली खात्यांतर्गत परिक्षा उत्तीर्ण होण्याची अट रद्दबातल करावी यासाठी दि म्युनिसिपल युनियनच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव टाकला जात आहे. परंतु या दबावाला न जुमानणाऱ्या प्रशासनाचा निषेध म्हणून शुक्रवारी ११ वाजता आझाद मैदानात लिपिकांचा मोर्चा काढला जाणार आहे. येत्या रविवारी २६ जून रोजी होणारी या पदासाठीची परीक्षा त्वरीत रद्द करावी यासाठी मागणीसाठी हा मोर्चा असल्याचे युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी म्हटले आहे.
२६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली खात्यांतर्गत परिक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागण्यांकडे सातत्याने लक्ष वेधण्यात येत आहे, परंतु हा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाची अनास्था दिसून येत आहे. या मागण्यांकडे मा. महापालिका आयुक्त यांचे लक्ष वेधण्याकरिता मुंबई महापालिकेतील समस्त लिपिकीय कर्मचारी शुक्रवारी २४ जून रोजी सकाळी ११.०० वाजता मोर्चाने आझाद मैदान येथे जमणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – ‘शिवसेने’चा आकडा कमी झालाय, संजय राऊतांनीच केलं मान्य म्हणाले…)
काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेत एस.एस.सी. उत्तीर्ण उमेदवारांना लिपिकीय पदांवर भरती करण्यात येत असे. मात्र, २०१७ पासून सदर अर्हता बदलून उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा, त्याच्याकडे इंग्रजी व मराठी टायपिंग व एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण असावा, अशी करण्यात आलेली आहे. त्याशिवाय भरतीच्या वेळेस मुंबई महानगरपालिकेने घेतलेली परिक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मुंबई महानगरपालिकेतील लिपिकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियमित तथा कालबद्ध पदोन्नती देण्यात येते.
परीक्षेवर कर्मचारी १००% टाकणार बहिष्कार
मात्र, या पदोन्नतीकरिता खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असल्याने बहुतांश लिपिकीय कर्मचारी नियमित तथा कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित आहेत. महापालिका प्रशासनाने लिपिकीय संवर्गासाठी असलेल्या परीक्षा दरवर्षी घेणे बंधनकारक होते, मात्र, गेल्या १७ वर्षांच्या काळात केवळ ४ परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. खात्यांतर्गत परीक्षा विहित वेळेत न घेतल्यामुळे लिपिकीय संवार्गामध्ये या परीक्षेविषयी औदासिन्य निर्माण होऊन त्यांच्या आत्मविश्वासाला तडा गेला आहे. कोविड १९ या महामारीच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी स्वतःचा व त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून, जोखीम पत्करून लढा दिला आहे. या लढ्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे २२५ हून अधिक कर्मचारी शहीद झाले आहेत, त्याशिवाय या कालावधीत दैनंदिन पातळीवर कर्तव्यासाठी उपस्थित झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना संसर्ग होऊन बळी गेलेल्यांची संख्या हजारापेक्षा जास्त आहे. महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास, दिनांक २६ जून २०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेवर कर्मचारी १००% बहिष्कार टाकतील,असा इशारा बने यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community