माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असल्याचे भासवून एका मुंबईतील एका व्यवसायिकाला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार वरळी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनोळखी मोबाईल क्रमांक धारकाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
( हेही वाचा : गणपतीसाठी कोकण प्रशासन सज्ज! महामार्गावर मदतीसाठी २१ वैद्यकीय मदत केंद्रे)
२५ हजारांची रक्कम
दिलीप जांभळे असे व्यासायिकांचे नाव आहे. जांभळे हे व्यवसायाने कुस्तीपटू असून वरळी कोळीवाडा येथे राहत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून इंग्रजीमध्ये काही मेसेज आले होते. अनोळख्या क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपच्या डीपीवर माजी पर्यावरण मंत्री तसेच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो ठेवण्यात आला होता.
गुन्हा दाखल
दिलीप जांभळे यांनी डीपी बघून मेसेज उघडला असता त्यात इंग्रजी मध्ये हाय हॅलो करीत, मी आदित्य ठाकरे असल्याचे संबंधिताने मेसेजमध्ये म्हटले होते, जांभळे यांनी मेसेजला उत्तर दिले. तुमच्याकडे एक काम आहे, तुमचे पेटीएम सुरू आहे का? असा प्रश्न विचारत माझ्या एका मित्राचा क्रमांक पाठवतो त्याच्यावर २५ हजार रुपये तात्काळ पाठवा, मी उद्या सकाळी परत करतो असे सांगून पैशांची मागणी केली. आदित्य ठाकरे यांना २५ हजारांची एवढी काय गरज पडली म्हणून जांभळे थोडे गडबडले आणि त्यांना संशय आला म्हणून त्यांनी शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना फोन करून मेसेजबाबत सांगितले.
कोणीतरी तुमची फसवणूक करतोय, पैसे पाठवू नका असे सांगून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास चव्हाण यांनी सांगितले. दिलीप जांभळे यांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनोळखी व्हॉट्सअॅप धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community