देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी आज (दिनांक १८ जून २०२३) रोजी ‘मन की बात’मध्ये पर्यावरण संवर्धनासाठी देशभरात विविध संस्था, संघटना, व्यक्तींकडून सुरू असलेल्या कार्याचा गौरव केला. महाराष्ट्रासाठी आणि मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘नागरी वन उपक्रमाचे’ (मियावाकी जंगल) कौतुक केले.
मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सतत नवनवीन उपक्रम हाती घेतले जातात. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत सन २०२० पासून मुंबईत तब्बल ६० ठिकाणी नागरी वन (मियावाकी) तयार करण्यात आले आहे. या जंगलांमध्ये एकूण चार लाख झाडे बहरली असून, या झाडांमुळे मुंबईकरांना शुद्ध हवा मिळत आहे.
देशाचे पंतप्रधान महिन्यातून एकदा देशाच्या जनतेशी संवाद साधतात. या ‘मन की बात’मध्ये ते अनेक प्रेरणादायी उपक्रम, विविध योजना, युवक, रोजगार, क्रीडा, उद्योग, साहित्य, कला आदी विषयावर मार्गदर्शन करतात. या संवादात ते देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तींविषयी, संस्था-संघटनांविषयी त्यांच्या उपक्रमांविषयी माहिती देतात. ‘मन की बात’मुळे अनेकांच्या कार्याला प्रेरणा मिळते. आजच्या (१८ जून) ‘मन की बात’मध्येदेखील त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या मियावाकी जंगलांबाबत उल्लेख केला. तसेच ६० ठिकाणी जंगल विकसित केल्याचे सांगितले. स्वतः पंतप्रधानांनी या उपक्रमाविषयी कौतुक केले.
सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगरात तब्बल ६० ठिकाणी अशी जंगले विकसीत केली असून त्यात चार लाख झाडे आहेत. तसेच आणखी १२ ठिकाणी देखील असे जंगल तयार करण्याचे काम सुरू असून, त्याद्वारे नवीन १ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – योगा करून जीवनात मोठ्या परिवर्तनाचा लाभ घ्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी)
असे आहे नागरी वन उपक्रम (मियावाकी)
सन १९६९ पासून, डॉ. अकिरा मियावाकी यांनी संपूर्ण जपानमधील वनस्पतींचा अभ्यास करून अशाप्रकारची वने विकसित केली आहेत. डॉ. मियावाकी यांचा दृष्टीकोन मुख्यतः या प्रदेशातील मूळ वृक्षांच्या प्रजातींचा वापर करून संभाव्य नैसर्गिक वनस्पतींच्या शक्य तितक्या मुख्य झाडांची रोपे लावणे हा आहे. ज्या दिवसापासून झाडे लावली जातात, त्या दिवसापासून ही झाडे वैयक्तिक स्पर्धेद्वारे वाढत असतात. ही झाडे पाच वर्षांनंतर चार मीटर, दहा वर्षांनंतर आठ मीटर आणि २५ वर्षांनी २० मीटरपर्यंत पोहोचतात आणि तीन वर्षांनी नैसर्गिकरित्या वैविध्यपूर्ण जंगल वाढते. तसेच वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण होते आणि जमिनीचे धूप होण्यापासून संरक्षणही होते.
तीन वर्षांपूर्वी म्हणजे सन २०२० मध्ये मुंबईत मियावाकी पध्दतीने मुंबईत झाडे लावण्यात आली. त्यासाठी मुंबईतील ६० हून अधिक भूखंडांची निवड करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत तब्बल ४ लाखांहून अधिक झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे या जंगलांमुळे मुंबईपासून दूर गेलेले अनेक पक्षी आणि किटकांच्या प्रजाती पुन्हा परतल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही मोहीम हाती घेतल्यानंतर काही एनजीओ आणि व्यावसायिक संघटनांचीदेखील मदत घेतली आहे. या उपक्रमाचे जपान सरकारनेदेखील दखल घेतली असून, पत्राद्वारे कौतुक केले आहे. तसेच टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्र समुहाने आणि JSW ने देखील ‘अर्थकेअर पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.
वर्षभरात होणार २५ हजाार झाडांचे वृक्षारोपण
मुंबईकरांच्या अवतीभवती सदा हिरवळ बहरलेली असावी या हेतूने झटणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून येत्या वर्षभरात मुंबईमध्ये २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे हरित मुंबईसाठीच्या मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे.
मुंबई सलग दुसरऱ्यांदा ठरली “जागतिक वृक्ष नगरी “
मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल अलीकडे जागतिक स्तरावरदेखील घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization) आणि आर्बर डे फाउंडेशनकडून (Tree Cities of The World) “जागतिक वृक्ष नगरी ” हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार सन २०२१ आणि २०२२ अशी सलग दोन वर्ष मुंबई महानगराला मिळाला आहे. मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम हाती घेत असते. याशिवाय नागरी वन उपक्रमात (मियावाकी) वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
मुंबईची वृक्षसंपदा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने आतापर्यंत नागरी वन उपक्रमात (मियावाकी) चार लाख झाडे लावली आहेत. तसेच दरवर्षी पारंपरिक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्यात येतात. त्यामुळे सध्या मुंबई शहराच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही ३३ लाख झाडे महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील सरकारी, खासगी, औद्योगिक जमिनींवर तसेच महानगरातील विविध उद्यानांमध्ये आणि रस्तांभोवती बहरलेली दिसत आहेत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने महानगरात ठिकठिकाणी उद्याने विकसीत केली आहेत. सध्या मुंबईकरांच्या सेवेत तब्बल १०६८ उद्याने आहेत. याठिकाणी बहरलेली वृक्षसंपदा मुंबईकरांचे जगणे आनंदी करीत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community