गोरखपूरच्या गीता प्रेसला 2021 साठी गांधी शांतता पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या आदर्शांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने त्यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने 1995 मध्ये गांधी शांतता पुरस्कार या वार्षिक पुरस्काराची स्थापना केली. देश, पंथ, भाषा, जात, धर्म किंवा लिंग अशा कोणत्याही निकषाविना हा पुरस्कार सर्व व्यक्तींसाठी खुला आहे. 1 कोटी रुपये, स्मृतिचिन्ह, एक पट्टिका आणि एक उत्कृष्ट पारंपरिक हस्तकला/ हातमाग वस्तू असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यापूर्वी इस्रो, रामकृष्ण मिशन, बांगलादेशची ग्रामीण बँक, कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र,बंगळूरुची अक्षय पत्र, एकल अभियान ट्रस्ट, इंडिया आणि सुलभ इंटरनॅशनल नवी दिल्ली यांसारख्या संस्था या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ. नेल्सन मंडेला, टांझानियाचे माजी अध्यक्ष डॉ. ज्युलियस न्येरेरे, श्रीलंकेतील सर्वोदय श्रमदान चळवळीचे संस्थापक सदस्य डॉ. ए. टी. अरियारत्ने, जर्मनीचे डॉ. गेऱ्हार्ड फिशर, बाबा आमटे, डॉ. जॉन ह्युम, आयर्लंड, चेक प्रजासत्ताकाचे माजी अध्यक्ष वाक्लेव हवेल, दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेसमंड टुटू, चंडीप्रसाद भट्ट आणि जपानचे योहेई सासाकावा यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तींना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलीकडच्या काळात ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद (2019) आणि बांगलादेशचे बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान(2020) यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
(हेही वाचा – शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदे यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी)
गीता प्रेसला हा पुरस्कार देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने 18 जून 2023 रोजी एकमताने निर्णय घेतला आहे. 1923 मध्ये स्थापना झालेली गीता प्रेस ही जगातील सर्वात मोठ्या प्रकाशन संस्थांपैकी एक असून या संस्थेने श्रीमद भग्वदगीतेच्या 16.21 कोटी प्रतींसह 14 भाषांमधील 41.7 कोटी पुस्तके प्रकाशित केली आहेत. उत्पन्न प्राप्तीसाठी या संस्थेने आपल्या प्रकाशनांमध्ये कधीही आपली जाहिरात केली नाही. गीता प्रेस आपल्या संलग्न संस्थांसह सर्वांचे कल्याण आणि चांगले जीवन यांसाठी प्रयत्नशील असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता प्रेसने शांतता आणि सौहार्दाच्या गांधीवादी आदर्शांचा प्रसार करण्यामध्ये दिलेल्या योगदानाचे स्मरण केले आहे. स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असताना गांधी शांतता पुरस्कार मिळणे हा गीता प्रेस या संस्थेने समुदायाच्या सेवेसाठी केलेल्या कार्याचा गौरव आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
I congratulate Gita Press, Gorakhpur on being conferred the Gandhi Peace Prize 2021. They have done commendable work over the last 100 years towards furthering social and cultural transformations among the people. @GitaPress https://t.co/B9DmkE9AvS
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2023
गोरखपूरच्या गीता प्रेस ची गांधी शांतता पुरस्कार, 2021 साठी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी या संस्थेचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे; “गांधी शांतता पुरस्कार, 2021 साठी निवड झाल्याबद्दल मी गीता प्रेस गोरखपूरचे अभिनंदन करतो. त्यांनी गेल्या 100 वर्षात, लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी अत्यंत अभिमानास्पद काम केले आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community