चंद्रयान ३ च्या यशानंतर शास्त्रज्ञाचे अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. या वेळी इस्रोचे प्रमुख यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या वेळी शास्त्रज्ञांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेत सहभागी असलेल्या महिला शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक केले म्हणाले, ‘आपल्या मनातील संकल्प पूर्ण करण्यासाठी शक्तीचा आशीर्वाद आवश्यक आहे. ही शक्ती आपली नारीशक्ती आहे. आपल्या माता, भगिनी या शक्तीचे प्रतीक आहेत.’
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपल्याकडे म्हणतात, ‘सृष्टी स्थिती विनाशानां, शक्ती भूते सनातनी’ म्हणजेच सृष्टीच्या निर्मितीपासून प्रलयापर्यंत संपूर्ण सृष्टीचा आधार नारीशक्तीच आहे. अशा प्रकारे पंतप्रधानांनी चंद्रयान ३ च्या मोहिमेत सहभागी असलेल्या नारीशक्तीच्या योगदानाला नमन केले.
विज्ञानाचा वापर मानवतेच्या विकासासाठीच करायचा आहे !
‘तुम्ही सर्वांनी पाहिले असेल चंद्रयान 3 मध्ये देशातील महिला वैज्ञानिकांनी, देशातील नारीशक्तीने किती मोठी भूमिका निभावली आहे. चंद्राचा शिवशक्ती पॉईंट अनेक वर्षांपर्यंत संपूर्ण जगात याचीच साक्ष देईल. हा शिवशक्ती पॉईंट येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल की, आपल्याला विज्ञानाचा वापर मानवतेच्या विकासासाठीच करायचा आहे. हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहे’, या शब्दांवर त्यांनी जोर दिला.
तुम्ही मेक इन इंडियाला चंद्रावर नेले
प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर यश मिळतेच. आज भारत हा चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करणारा जगातील चौथा देश बनला आहे. भारताचा प्रवास कुठून सुरू झाला, हे पाहिल्यावर हे यश आणखी मोठे होते. एकेकाळी भारताकडे आवश्यक तंत्रज्ञान नव्हते. जगात तिसऱ्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांमध्ये आपली गणना होत होती. तिथून बाहेर पडल्यानंतर आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आज भारताची गणना पहिल्या रांगेत होत आहे. या प्रवासात इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे. तुम्ही मेक इन इंडियाला आज चंद्रावर नेले आहे.
तुम्ही तपस्या करून लोकांचा विश्वास संपादन केला आहे
देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. विश्वास संपादन करणे सोपे नाही. तुम्ही तपस्या करून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. देशातील जनतेचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. या आशीर्वादाने आणि समर्पणाने भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जागात आघाडीवर जाईल. आपला नवनिर्मितीचा हा वेग २०४७ ग्लोबल इंडियाचे स्वप्न साकार करेल. देशवासियांना तुमचा अभिमान आहे. स्वप्ने वेगाने संकल्प होत आहेत. तुमची मेहनत त्या संकल्पाला पूर्णत्वाकडे नेत आहे. कोट्यवधी देशवासियांच्या वतीने आणि जगातील वैज्ञानिक समुदायाच्या वतीने माझ्याकडून शुभेच्छा, असे भावोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community