तुमच्या परिश्रमांना, धैर्याला, तळमळीला, चिकाटीला माझे अभिवादन ! तुम्ही देशाला ज्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, ते सामान्य काम नाही. हा अंतरिक्ष क्षेत्रात भारताच्या सामर्थ्याचा शंखनाद आहे. भारत चंद्रावर आहे, आपल्या ते केवळ तुमच्यामुळे झाले आहे, असे भावूक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते इस्रोच्या मुख्यालयात चंद्रयान ३ मोहिमेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांशी संवाद साधत होते. चांद्रयान ३ च्या यशानंतर शास्त्रज्ञाचे अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. या वेळी इस्रोचे प्रमुख यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
(हेही वाचा – PM Modi In Bangalore : पंतप्रधान मोदी इस्रोच्या मुख्यालयात दाखल)
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले,
आपल्याला भेटून माझे तन-मन आनंदने भरले
चंद्रयान ३ चंद्रावर उतरले, तेव्हा मी दक्षिण आफ्रिकेत होतो. त्यानंतर ग्रीसमध्ये होतो; पण माझे मन पूर्णपणे तुमच्यासोबतच होते. आपल्याला भेटून वेगळा आनंद अनुभवत आहे. असा आनंद काही दुर्मिळ प्रसंगातच अनुभवता येतो. आज माझे तन-मन आनंदने भरले आहे. काही वेळा आपण आनंदाने उतावीळ होतो. आता माझ्याबाबतीतही असेच झाले आहे. इतक्या सकाळी तुम्हा सगळ्यांना बोलावले, त्यामुळे तुम्हाला अडचण आली असेल; पण तुम्हा अभिवादन करण्याची इच्छा होती. मी भारतात आल्यावरच आपले दर्शन घेण्याची इच्छा होती. तुम्हा सगळ्यांना सॅल्यूट करावे वाटत होते.
हा विश्वाला अंधकारात प्रकाश देणारा भारत
यापूर्वी जे कोणी केले नाही, ते आपण केले आहे. ज्या स्थानी आतापर्यंत कोणी पोहोचले नाही, त्या स्थानी आपण पोहोचलो आहोत. नवा हा भारत निर्भीड, झुंजार आहे. हा विश्वाला अंधकारात प्रकाश देणारा भारत आहे. पुढे जाऊन आपण विश्वातील मोठ्या समस्यांवर मार्ग काढू शकतो. जेव्हा चंद्रयान ३ चंद्रावर उतरले, तेव्हा देशवासियांनी जो जल्लोष केला, तो क्षण कसा विसरू शकतो ? काही स्मृती अमर होतात. तसा हा दिवस अमर होणार आहे. प्रत्येक भारतियाला वाटत होते की, हा विजय त्याचा आहे. आजही अभिनंदन होत आहे. ते सगळे तुम्हा सर्वांमुळे शक्य झाले. तुमचे जितके कौतुक करावे तितके ते कमीच आहे.
साऱ्या विश्वाने भारताचे विज्ञान क्षेत्रातील सामर्थ्य ओळखले
एका बाजूला विक्रमचा विश्वास आहे, तर दुसरीकडे प्रज्ञानचा पराक्रम आहे. प्रज्ञान चंद्रावर त्याचे पदचिन्ह सोडत आहे. पृथ्वीच्या लाखो वर्षांच्या इतिहासात प्रथमच त्या स्थानाची छायाचित्रे आपण पाहू शकत आहोत. हे काम भारताने केले आहे. या निमित्ताने साऱ्या विश्वाने भारताचे विज्ञान क्षेत्रातील सामर्थ्य ओळखले आहे, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community