सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या बदलीत प्रिंटींग मिस्टेक?

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे हे शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे अगदी विश्वासू मानले जात असल्याने अखेर त्यांची मागील आठवड्यात डी विभागाच्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली. मात्र, उघडे यांची बदली डि विभागात होऊनही त्यांना आयुक्तांनी पदभार स्वीकारण्यास थोडं थांबा असे सांगत होल्डवर ठेवलं आहे. पण उघडे यांची बदली आदेशात प्रिंटींग मिस्टेक झाल्याची चर्चा ऐकायला येत आहे. उघडे यांची बदली करायची होती मुलुंड टी विभागात करायची होती आणि आदेश निघाले मलबार हिल डी विभागाचे. त्यामुळे उघडे यांची बदली होणार होती उत्तरेला आणि बदली झाली दक्षिणेला. त्यामुळे गणेशोत्सव झाल्यानंतरच उघडे आता नक्की कुठल्या विभागाचा पदभार स्वीकारतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

( हेही वाचा : यंदाही पंचगंगा आणि स्वप्नाक्षय मित्र मंडळ महापालिकेच्या गणेश गौरव स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये )

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त म्हणून आपले काम चोख करणारे आणि नवनवीन संकल्पना राबवणारे अशी ख्याती असणारे शरद उघडे यांच्या कामावर शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे भारीच फिदा झाले होते. वरळी विधान सभेचे क्षेत्र हे वरळी विधानसभा मतदार संघात येत असल्याने आदित्य ठाकरे यांनी उघडे यांना हाताशी धरून नवनवीन संकल्पना राबवत वरळीचा रोल मॉडेल बनवण्याचे स्वप्न रचले होते. त्या रोल मॉडेलला उघडे यांनी गती देण्याचेही काम केले होते. रस्त्यांची कामे, सुशोभिकरणाची कामे, पदपथांची सुधारणा आदींची कामे करत वरळीचा रोल मॉडेल करण्यासाठी आवश्यक निधीही आदित्य ठाकरे यांनी जी दक्षिण विभागाकडे वळता केला होता. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी म्हणून आपले चोख बजावताना उघडे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांची मते विचारात घेतली नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी बनले तरी शिवसेना नगरसेवक मात्र त्यांच्या विरोधात होते. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर दोनच महिन्यांमध्ये उघडे यांची बदली डि विभागात करण्यात आली.

मात्र, या बदलीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उघडे यांची बदली मुलुंड टी विभागात केली जाणार होती. त्याप्रकारे आयुक्तांनी बदलीचा निर्णयही घेतला होता, परंतु आयत्या वेळी त्यांची बदली डि विभागात करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मुलुंडमध्ये सर्व नगरसेवक आणि आमदार हे भाजप असतानाही त्यांनी उघडे यांना स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. परंतु शेवटच्या क्षणी चक्रे फिरली आणि त्यांची डि विभागात बदली करण्यात आली. ही बदली करताना मलबार हिलचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री यांना साधीही कल्पनाही न देताही हि बदली करण्यात आली. त्यामुळे ते प्रचंड नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातच गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाची मोठी तयारी असल्याने विद्यमान सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे उत्सवापर्यंत पदभार राहू दे,त्यानंतर उघडे यांनी पदभार स्वीकारावा अशाप्रकारचा निर्णय आयुक्तांच्या स्तरावर घेण्यात आल्याची माहितीही मिळत आहे. त्यामुळे गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची तयारीची जबाबदारी मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीनंतर सोमवारपासून उघडे हे डि विभागाचा पदभार स्वीकारतील असे बोलले जात आहे. परंतु ज्या महापालिकेत २४ तासांमध्ये बदलीचे आदेश बदलले जात आहेत, तिथे उघडे हे डि विभागात जातात कि अन्य कुठल्या विभागात जातात याकडेच सर्वांचे लागून आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here