राज्यातील कारागृह झाले ‘हाऊसफुल्ल’, कच्च्या कैद्यांचे होतायेत हाल

183
राज्यभरातील कारागृह हाऊसफुल्ल झाले आहेत, कच्चे कैदी यांचे हाऊसफुल्ल झालेल्या तुरुंगात अतोनात हाल होत आहे. तुरुंगातील बॅरेक क्षमतेपेक्षा जास्त भरल्यामुळे अनेक कैद्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. दिवसेंदिवस कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे तुरुंग प्रशासनावर देखील मोठा ताण पडत असल्याची माहिती कारागृह सूत्रांनी दिली आहे.

क्षमतेपेक्षा दुप्पट संख्येने कैदी

राज्यभरात जिल्हा, मध्यवर्ती, खुले असे एकूण ६० कारागृहे आहेत. त्यापैकी येरवडा, नाशिक, आर्थर रोड, नाशिक रोड, कोल्हापूर, नागपूर मध्यवर्ती, कल्याण आधारवाडी, ठाणे मध्यवर्ती हे कारागृहे राज्यातील महत्वाची कारागृहे आहेत. ६० कारागृहांतील कैद्यांची अधिकृत क्षमता २४ हजार ७२२ एवढी आहे, मात्र सद्यस्थितीत या तुरुंगात ४२ हजार ७२७ कैदी आहेत, यामध्ये कच्चे कैदी (न्यायबंदी), शिक्षा झालेले कैदी, तसेच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कैद्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या काळात ६ हजार पेक्षा अधिक कैदी तात्पुरत्या जामीनावर बाहेर पडून देखील कारागृहतील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

येरवाडा तुरुंगात तीन पट कैदी

राज्यातील येरवडा कारागृह हे सर्वाधिक क्षमतेचे कारागृह असून येरवडा मध्यवर्ती कारगृहातील कैद्यांची अधिकृत क्षमता २,३२३ (पुरुष) आणि १२६ (महिला) असे एकूण २,४४९ एवढी आहे. सद्यस्थितीला येरवडा कारागृहात ६,७२३ पुरुष कैदी आणि २९८ महिला कैदी आणि ६ तृतीयपंथी असे एकूण ७ हजार २७ कैदी आहेत. या कारागृहातील कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा तीन पट अधिक आहे.

आर्थर रोडमध्ये चौपट संख्या

मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची अधिकृत क्षमता ८०४ असून सद्यस्थितीत या कारागृहात ३ हजार ५३० कैदी आहेत. ठाणे मध्यवर्ती अधिकृत क्षमता १ हजार १०५ एवढी असून सद्यस्थितीत या कारागृहात ४,२४५ कैदी आहेत. कल्याण जिल्हा क्षमता ५४० सद्यस्थितीत २,१०७, तळोजा मध्यवर्ती क्षमता २,१२४ सद्यस्थितीत ३ हजार ३३२, नागपूर मध्यवर्ती १,८४० सद्यस्थितीत ३,०५५ हे कारागृह सर्वात अधिक कैद्याची संख्या असलेले राज्यातील कारागृहे आहेत, त्यात मोठ्या संख्येने न्यायबंदी आहेत.

निद्रानाशमुळे कैदी आजारी पडतायेत

राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त कैद्यांची संख्या असल्यामुळे तुरुंग प्रशासनावर मोठा ताण पडत आहे, तर दुसरीकडे कारागृहात झोपेच्या जागेवरून कैद्यांमध्ये वाद वाढत आहे. बॅरेकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात येत आल्यामुळे नवीन येणाऱ्या न्यायबंदी, कच्चे कैदी यांना जुन्या कैद्यामुळे झोपण्यास जागा मिळत नसल्यामुळे रात्रभर त्यांचे जागरण होऊन निद्रानाशमुळे हे कैदी आजारी पडत असल्याची माहिती कारागृह सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.