खासगी लसीकरण केंद्र बंद! मग रिलायन्स आणि नानावटीत लस आल्या कुठून?

मुंबई महापालिकेकडेच जर लससाठा नाही तर या दोन खासगी रुग्णालयांकडे कुठून आला, असा प्रश्न आता मुंबईकरांना पडू लागला आहे.

125

मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्र मागील चार दिवसांपासून बंद आहेत. खुद्द महापालिकेनेच ही केंद्र बंद असल्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात मंगळवारी गिरगावमधील एच.एन. रिलायन्स रुग्णालय आणि विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात लसीकरण पार पडले. त्यामुळे मुंबईत सर्व खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्र बंद असताना, या दोनच रुग्णालयांना लस कोणी दिल्या, मुंबई महापालिकेकडेच जर लससाठा नाही तर या दोन खासगी रुग्णालयांकडे कुठून आला, असे प्रश्न आता मुंबईकरांना पडू लागले आहेत.

दोन खासगी केंद्रांत लसीकरण

मुंबईतील सध्या महापालिका व खासगी रुग्णालयांमधील ७१ केंद्रांमध्ये, तर ७३ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू आहेत. यामधील मागील शनिवारपासून सर्व खासगी रुग्णालयांच्या केंद्रांमधील लसीकरण बंद आहेत. तर केवळ महापालिका व शासकीय रुग्णालयांमधील केंद्रातच लसीकरण सुरू आहे. मात्र, एकाबाजूला लससाठा कमी असल्याने खासगी लसीकरण केंद्र बंद असतानाच, मंगळवारी गिरगाव येथील एच.एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये ७६९ आणि नायर रुग्णालयातील केंद्रात २९० नागरिकांचे लसीकरण पार पडले. त्यामुळे या दोन्ही लसीकरण केंद्रांत १ हजार ५९ एवढे लसीकरण पार पडले. मंगळवारी जिथे सर्व खासगी रुग्णालयांमधील केंद्रे बंद ठेवण्यात आली होती, तिथे या दोनच रुग्णालयांमधील केंद्रांना लस देण्यात आल्याने, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

(हेही वाचाः ५ मे रोजी ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे शासकीय व महापालिका केंद्रांवर होणार लसीकरण)

या रुग्णालयांवर राजकीय वरदहस्त?

विशेष म्हणजे एच.एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोविड झाल्यानंतर दाखल करण्यात आले होते. तसेच मोठ्या सेलिब्रेटींना याठिकाणी दाखल केले जात आहे. त्यातच रिलायन्स रुग्णालयाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गळ घातल्याने, वरळीतील एनएससीआय डोम कोविड सेंटरमधील सर्व व्यवस्था यापुढे या रुग्णालयामार्फत राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या रुग्णालयाला राजकीय वरदहस्त असल्यानेच लस उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच नानावटी रुग्णालयातही उच्चभ्रू तथा सेलिब्रेटीज जात असतात. त्यामुळे नानावटी रुग्णालयालाही लस उपलब्ध करुन दिल्याचे बोलले जात आहे.

कोणी पुरवली लस?

अशाप्रकारे या दोन रुग्णालयांत श्रीमंतांना लस देण्यासाठी नियमही डावलले जात आहेत, अशी चर्चा होत आहे. आजवर सर्व खासगी रग्णालयांमधील केंद्रांना त्यांच्याकडील नेांदणीनुसार महापालिका लस उपलब्ध करुन देते. पण महापालिकेनेच ही केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे, त्यांच्याकडून खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे या लसींचा साठा दोन्ही रुग्णालयांना कोणी आणि कुठून उपलब्ध करुन दिला, असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.

(हेही वाचाः ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाच्या उद्घाटनात महापौर ‘आऊट’!)

महापालिका व शासकीय लसीकरण केंद्रांत मंगळवारी दिवसभरात २६ हजार ९४४ एवढे लसीकरण पार पडले. यामध्ये पहिला डोस ५ हजार ३५७ जणांनी घेतला, तर २१ हजार ५८७ जणांनी दुसरा डोस घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.