शिकण्याच्या अत्याधुनिक सुविधा फक्त शहरांमध्ये उपलब्ध आहेत. लहान आकाराच्या शहरांमध्ये, ग्रामीण भागात अजूनही फळ्यावर किंवा चार्टच्या सहाय्याने शिकवले जाते. पण कर्नाटकातील एका प्रोफेसरने याला छेद दिला आहे. ३० वर्षीय शिक्षकाने दोन लाखांत एक रोबॉट बनवला आहे, जो खेडेगावातील मुलांना शिकवू शकवतो.
निळ्या रंगाचे शर्ट, सोनेरी केस, आकर्षक डोळे असणाऱ्या या रोबोटचे नाव ‘शिक्षा’ असे ठेवण्यात आले आहे. कर्नाटकातल्या सिरसी गावात सध्या या रोबोटची जोरदार चर्चा सुरू आहे. मुलांच्या लाडक्या रोबोटला ‘बोलणारी बाहुली’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. कर्नाटकातील एमइएस चैतन्य प्री – युनिव्हर्सीटी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या एका प्रोफेसरांनी या अत्याधुनिक रोबॉटची निर्मिती केली आहे.
अक्षय माशेलकर यांनी हा रोबोट बनवला आहे . ते म्हणाले की “खेड्यात वाढल्यामुळे मला ग्रामीण भागातील शाळांच्या मर्यादांची चांगल्या तऱ्हेने जाणीव होती. आम्ही अजूनही चार्ट्स आणि ब्लॉक्सचा शिकण्याचे साधन म्हणून वापर करतो. शिकवण्याच्या कोणत्याही वैज्ञानिक पद्धती इथे उपलब्ध नाहीत. मला ते बदलायचे आहे”
(हेही वाचा – माणूस चुका का करतो? काय सांगतात वैज्ञानिक?)
अक्षय यांच्या घरात लहानपणापासून शैक्षणिक वातावरण होते. त्यांची आई शिक्षिका होती. पुढे ते प्रोफेसर म्हणून नोकरीत रूजू झाले. पण त्यांच्या डोक्यात भारतातील शिक्षण व्यवस्था बदलण्याचे ध्येय होते. शिकवण्याची पद्धत जर अधिक आकर्षक बनली तर विद्यार्थ्यांची शिक्षणातली रूची निश्चितच वाढेल. यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक लॉकडाऊनच्या काळात वेळ काढला आणि ‘शिक्षा’ वर काम केले.
पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हा रोबोट शिकवू शकतो. आतापर्यंत कर्नाटकातील २५ हून अधिक शाळांत या रोबोटचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे. या रोबोटचे प्रथम व्हर्जन बनवण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांचा खर्च आला होता. सरकार आणि इतर सामजिक संस्थांच्या आर्थिक सहाय्याने या रोबोटचा खर्च ३५ हजारांनी कमी करणे शक्य होणार आहे.
शिकवण्याच्या पद्धतीत फक्त रोबोटचा अंतर्भाव करणे हा अक्षय यांचा हेतू नाही. तर विद्यार्थ्यांची विज्ञान – तंत्रज्ञानाशी मैत्री व्हावी हे त्यांचे व्यापक उद्दीष्ट आहे.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community