देशातील संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या 57 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात तर या निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच रंगणार आहे. त्यामुळे सध्या या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. पण देशाच्या याच सर्वोच्च सभागृहाच्या निवडणुकीची पद्धत नेमकी आली कुठून?
भारताने जरी ब्रिटनच्या राज्यघटनेवरुन संसदीय शासनपद्धती स्वीकारली असली, तरी भारतीय राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी जगभरातील 60 पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यामुळे राज्यघटनेतील अनेक तरतुदींचे स्त्रोत हे वेगवेगळे आहेत. आता भारतीय राज्यघटनेतील राज्यसभा निवडणुकीची पद्धत ही दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आली आहे. या पद्धतीनुसारच राज्यसभेच्या निवडणुका घेण्यात येतात. ही पद्धत खूपच खास आहे.
अशी होते निवडणूक
देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसंख्येनुसार त्या राज्यातील राज्यसभा सदस्यांची संख्या ठरवली जाते. राज्यसभा सदस्यांना राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील आमदार मतदान करतात. या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षे असतो. या उमेदवारांना आमदार आपल्या पसंतीनुसार मत देतात. यालाच एकल संक्रमणीय मतदान (Single Transferable vote) म्हणतात. म्हणजेच आमदार यादीतील प्रत्येकाला मत देतात. फक्त आपल्याला ज्या उमेदवाराला पहिली पसंती द्यायची आहे त्याच्या नावापुढे आमदारांना 1 नंबर लिहावा लागतो. त्यानंतर यादीतील इतर उमेदवारांच्या पुढे पसंतीनुसार नंबर लिहून प्राधान्यक्रम द्यावा लागतो.
(हेही वाचाः उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीसाठी का करू शकणार नाहीत मतदान?)
यावरुन मतमोजणी होताना ज्या उमेदवारांना सगळ्यात जास्त पहिली पसंती मिळाली आहे, तो उमेदवार विजयी होतो. अशाप्रकारे जोपर्यंत सर्व उमेदवार निवडून येत नाहीत तोपर्यंत याच पद्धतीने मतदानाच्या फे-या होतात आणि अंतिम निकाल हाती येतो.
राज्यसभेची कमाल सदस्यसंख्या 250 असून, सध्या राज्यसभेत 245 सदस्य आहेत. यामध्ये राज्यांचे 229+केंद्रशासित प्रदेशांचे 4+ राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले 12 सदस्य आहेत. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असल्यामुळे ते लोकसभेप्रमाणे कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही. दर सहा वर्षांनी राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपतो आणि त्या जागांसाठी निवडणुका घेण्यात येतात. महाराष्ट्रातल्या 6 जागांसाठी ही निवडणूक 10 जून रोजी पार पडणार आहे.
(हेही वाचाः कोरोना झाल्याने फडणवीसांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार का?)
Join Our WhatsApp Community