वेबसीरिजच्या नावाखाली मुंबईत देहव्यापार

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका कास्टिंग डायरेक्टर महिलेला अटक केली आहे.

90

वेबसिरीज तसेच मालिकांच्या शूटिंगच्या नावाखाली मुंबईत देहव्यापाऱ्याचा धंदा सुरू आहे. या देहव्यापारात मॉडेलिंग क्षेत्रातील, तसेच टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने वर्सोवा येथे एका बड्या हॉटेलच्या खोलीत छापा टाकला असता, वेबसिरीजच्या नावाखाली सुरू असणारा देहव्यापाराचा धंदा उघडकीस आला आहे. याप्रकरणी समाजसेवा शाखेने तीन तरुणींची सुटका केली असून, त्यात दोघी मॉडेलिंगसाठी मुंबईत आल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका कास्टिंग डायरेक्टर महिलेला अटक केली आहे.

असा रचला सापळा

ब्युटीशियन आणि कास्टिंग डायरेक्टर असलेली एक महिला नवोदित कलाकारांकडून देहव्यापार करुन घेत असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या पथकाला मिळाली. सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भोसले यांच्या पथकाने या महिलेला पकडण्यासाठी सापळा रचला. बोगस ग्राहक बनून या महिलेला संपर्क करण्यात आला. वेबसिरीज, कॅलेंडर शूटमध्ये काम करणाऱ्या नवोदित मॉडेल पुरवत असल्याचे तिने सांगितले. सुमारे ५० हजार रुपयांच्या मोबदल्यात मॉडेल देत असल्याचे ती म्हणाली. बोगस ग्राहकाने तिची अट मान्य करताच मंगळवारी तिने वर्सोवा येथील हॉटेलमध्ये येण्यास सांगितले.

(हेही वाचाः नातवंड सांभाळायच्या वयात ती सांभाळत होती… ड्रग्सचा धंदा! कोण आहे ती?)

अशी करत होती फसवणूक

समाजसेवा शाखेच्या पथकाने बोगस ग्राहकासोबत जाऊन त्या हॉटेलमध्ये छापा टाकला. या महिलेने तीन तरुणींना देहव्यापारासाठी या ठिकाणी आणले होते. पोलिसांनी या तिघींची सुटका करतानाच या एजंट महिलेला अटक केली. ही महिला बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सक्रीय असून, अनेक निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे. ही महिला चित्रपट क्षेत्रात नशीब अजमावण्यासाठी आलेल्या तरुणींना देहव्यापार करण्यास भाग पाडते आणि नंतर वेबसिरीज अथवा एखाद्या मालिकेत किरकोळ भूमिका मिळवून देते, असे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या महिलेला पुढील चौकशीसाठी वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.