केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, मंगळवारी ‘अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली असून यादरम्यान तरुणांना अल्प कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या योजनेला तरूणांकडून मोठा विरोध दर्शवण्यात येत आहे.
काय घडला प्रकार
सैन्यात 4 वर्षांपर्यंत तरूणांना अग्निवीर म्हणून भरती करणाऱ्या अग्निपथ योजनेला विरोध सुरू झाला आहे. त्याची सुरुवात बिहारपासून झाली असून बक्सरमधील काही तरुणांनी ट्रेनवर दगडफेक केली आहे, तर मुझफ्फरपूरमध्ये लोक रस्त्यावर आक्रमक होत उतरल्याचे पाहायला मिळाले तर बक्सरमध्ये संतप्त तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा या दिशेला जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, काशी पटना जनशताब्दी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर सुमारे 18 मिनिटे थांबली. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवासी नाराज झाले असून त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळाले.
या तरतुदींना तरुणांचा विरोध
अवघ्या 4 वर्षांसाठी भरती करणे म्हणजे रोजगाराच्या हक्काचे उल्लंघन असल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. मंगळवारीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांनी दिल्लीत या योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत 17.5 वर्षांवरील आणि 21 वर्षांपर्यंतच्या तरुणांना अग्निवीर म्हणून भरती करण्यात येईल आणि त्यांना 4 वर्षांसाठी नोकरी मिळेल. यापैकी 25 टक्के तरुणांची पुढील सैन्यात नियमित नोकरीसाठी निवड केली जाईल आणि त्यासाठी स्वतंत्र तपासणी केली जाईल. अग्निवीर म्हणून काम केल्यानंतर, तरुणांना चार वर्षानंतर 11 लाख रुपयांचे एकवेळ पॅकेज दिले जाईल.
काय आहे अग्निपथ योजना
या योजनेमुळे देशातील तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. अनेक देशांमध्ये अभ्यास केल्यानंतर ही योजना आणली जात आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल आणि चांगला पगारही मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.