‘सावरकर विस्मृतीचे पडसाद’ आणि ‘सावरकर एक वादग्रस्त वारसा’चे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘सावरकर विस्मृतीचे पडसाद’ आणि ‘सावरकर एक वादग्रस्त वारसा’ या संचाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन करण्यात आले.

( हेही वाचा : राहुल गांधींच्या यात्रेला भारत जोडो नव्हे, ‘भारत छोडो’ नाव द्या; मुख्यमंत्र्यांची टीका )

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनाविषयी, त्यांच्या विचारांविषयी, त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी व्यासंगी आणि अभ्यासू लेखक विक्रम संपत यांनी दोन भागात सावरकरांचा चरित्रमय अभ्यास सादर केला आहे. घटना, तथ्य, त्याचे पुरावे, संदर्भ अशा परिपूर्ण पद्धतीने हे सावरकरांवरील व्यक्तिचित्रण आहे. या दोन्ही पुस्तकांचा मराठी अनुवाद रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी केले आहेत. चेतन कोळी यांनी त्याचे संपादन केले आहे. सावरकर विस्मृतीचे पडसाद (१८८३ – १९२४) आणि सावरकर एक वादग्रस्त वारसा (१९२४ – १९६६) असा हा अनुवादित पुस्तकांचा संच आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बुधवारी झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, तानाजी सावंत यांच्यासह शिवसेना नेते रामदास कदम, आनंद अडसूळ, गजानन कीर्तिकर, प्रताप जाधव, भावना गवळी, विजय शिवतारे, सदा सरवणकर, भरत गोगावले, बच्चू कडू, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सावरकर विस्मृतीचे पडसाद (१८८३ – १९२४) या खंडामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मापासून ते काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सशर्थ मुक्तता करून रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय झाल्यापर्यंतचा भाग येतो. त्यात त्यांच्या बालपणापासून, शिक्षणासाठी लंडनला जाणे, त्याचप्रमाणे त्यांचे लंडनमधील काम आणि त्यांना अटक झाल्यानंतर मार्सेयची जगप्रसिद्ध उडी असा महत्त्वाचा भाग या पहिल्या पुस्तकात आहे.

सावरकर एक वादग्रस्त वारसा (१९२४ – १९६६) या दुसऱ्या पुस्तकात रत्नागिरीमधील त्यांचे वास्तव्य, हिंदुत्त्वाचे लिखाण, अन्य महत्त्वाच्या साहित्याची निर्मिती आणि सर्वात महत्त्वाची म्हमजे रत्नागिरीमधील त्यांचे जातिभेद नष्ट करण्यासाठी उचललेले क्रांतिकारक पाऊल आणि कार्य याचा समावेश आहे. त्यानंतर १९३७ पासून हिंदुमहासभेचे त्यांनी भूषवलेले अध्यक्षपद, मुस्लीम लाचारी करण्याच्या काँग्रेस आणि महात्मा गांधी यांच्या विचारांना आणि कामांना सतत केलेला विरोध, फाळणीला केलेला विरोध, हिंदुंचे संघटन करण्याचे महत्त्वाचे काम, गांधी हत्येनंतरचा मनस्ताप आदी भाग तसेच त्यांच्या प्रायोपवेशनापर्यंतचा संपूर्ण काळ या दुसऱ्या भागात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्ण जीवनाचा आलेख लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम या दोन्ही खंडामधून मिळते. अलीकडच्या काळात धनंजय कीर यांच्या चरित्रलेखनानंतरचा अभ्यासपूर्ण असा सावरकर चरित्राचा हा व्यापक तपशील या दोन्ही संचांमधून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here