जम्मू आणि काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी बिहारच्या मजुरांवर हल्ला केला आहे. पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड फेकले आहे. या दहशतवादी घटनेत एक मजूर ठार झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. जम्मू- काश्मिर पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सध्या परिसरात नाकाबंदी केली आहे.
टार्गेट किलिंगच्या घटनांत वाढ
मोहम्मद मुमताज असे मृत मजुराचे नाव असून, तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी आहे. जम्मू- काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल अशी जखमींची नावे असून, दोघेही बिहारमधील रामपूरचे रहिवासी आहेत, दोघांची प्रकृती स्थिर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या कामगारांवर हल्ले वाढवले होते, पण गेल्या दोन महिन्यांपासून अशा टार्गेट किलिंगच्या घटना कमी झाल्या होत्या.
( हेही वाचा: Jio ग्राहकांना खुशखबर! १५ ऑगस्टला लॉंच होणार 5G सेवा )
हा तिसरा हल्ला
तीन दिवसांत जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा हा तिसरा हल्ला आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी, दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मिरमधील आलोचीबाग भागात पोलीस दलावरही हल्ला केला होता, परंतु नंतर ते पळून गेले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.