गुगल इंडिया कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा कॉल करून खळबळ उडवून देणाऱ्या एकाला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली आहे.
पणयम बाबू शिवानंद (४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने खोडसाळपणे हा कॉल केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मुंबईतील बीकेसी या ठिकाणी असलेल्या गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी एकाने कॉल करून पुण्यातील गुगल इंडिया कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. बीकेसी पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासले असता हा कॉल हैद्राबाद तेलंगणा येथील चांदनगर परिसरातून आल्याचे समोर आले.
( हेही वाचा: मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! ‘बेस्ट’च्या ताफ्यात देशातील पहिली एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल; प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा )
आरोपी अटकेत
बीकेसी पोलिसांचे एक पथक रविवारी हैद्राबाद येथे रवाना झाले. कॉल करणाऱ्या पणयम बाबू शिवानंद याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा कॉल खोडसाळपणे केल्याचे समोर आले. बीकेसी पोलिसांनी या प्रकरणी पणयम बाबू शिवानंद याला अटक केली आहे. बीकेसी पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.
Join Our WhatsApp Community