पुण्यातील कात्रजमधील 20 सिलिंडर स्फोटप्रकरणी पुणे पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायिक सागर पाटील यांच्यासह संबंधित जागेचा मालक आणि आणखी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी बेकायदेशीरपणे सिलिंडर भरण्याचे काम चालत होते. मात्र गॅस गळतीमुळे मंगळवारी एकापाठोपाठ 20 सिलिंडरचे स्फोट झाले. धक्कादायक म्हणजे याठिकाणी अनधिकृतरित्या सिलिंडरचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. 141 छोटे तर 26 मोठे सिलिंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.
नेमकी काय आहे घटना?
पुण्यातील कात्रज परिसरात मंगळवारी संध्याकाळी गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलिंडरचे हे स्फोट झाले असून या स्फोटांमुळे भीषण आगही लागली. या परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती देताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, २० सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेमुळे कोणी जखमी किंवा जिवितहानी झाल्याचे अद्याप माहिती नाही. मात्र, एकामागून एक झालेल्या सिलिंडर स्फोटांच्या मालिकेच्या आवाजांमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरल्याचे दिसून आले.
(हेही वाचा – गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याला मिळणार ‘ही’ खूशखबर! काय म्हणाले आरोग्यमंत्री?)
या आगीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. अग्निशमन दलाची सहा वाहने आणि जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हे स्फोट इतके भीषण होते की, त्याचा आवाज तब्बल 2 किलोमीटर दूर पर्यंत ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.