दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा वेळापत्रक अलिकडेच जाहीर करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही तयारीला लागले आहेत. अशातच पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पुणे महापालिका भरणार आहे. या तरतुदीला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यती दिली आहे.
महापालिका भरणार परीक्षा शुल्क
समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या शिक्षण विभागातील ४४ माध्यमिक शाळांमधून ४ हजार ३९२ विद्यार्थी यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यांचे प्रत्येकी ४१५ रुपये आणि तंत्रशाळेतील २०० विद्यार्थ्यांचे प्रति ५२५ रुपये परीक्षा शुल्क महापालिकेकडून भरण्यात येणार आहे.
तसेच महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील ४४९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे वाणिज्य शाखेचे ४३० रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रति ४९० रुपये परीक्षा शुल्क महापालिकेमार्फत भरण्यात येणार आहे.
( हेही वाचा : आरोग्य भरतीवरून आरोग्य मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा )
ऑफलाईन परीक्षा होणार
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे शिक्षणात खंड पडला आहे. पण, येत्या वर्षी या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच लेखी स्वरूपात घेतल्या जाणार आहेत. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 40, 50, 60 गुणांचे लेखी पेपर असतील त्यासाठी 15 मिनिटे अधिक वेळ देण्यात आल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community