राज्यभरात गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची घोषणा केली खरी, पण पुण्यात यंदा विसर्जन मिरवणुकीत बाप्पांच्या देखाव्याच्या उंचीवर मर्यादा असणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी पुणे शहरातील गणेश मंडळांना सूचना देत असे सांगितले की, लकडी पुलावर असलेल्या मेट्रोच्या ब्रिजमुळे रथाची उंची कमी, मर्यादित ठेवावी.
(हेही वाचा – गणेशोत्सवात लाऊड स्पीकर लावताय? जरा जपून! …नाहीतर होणार कारवाई)
दरवर्षी विसर्जन मिरवणुका या अलका चौकातून लकडी पुलावरून पुढे डेक्कनकडे मार्गस्थ होतात. मेट्रोच्या ब्रिजची उंची 21 फुट असल्याने देखाव्यासह 18 फुटच उंची ठेवण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. गणेश देखाव्याच्या रथाची उंची 21 फुटांपेक्षा कमी असायला हवी. अथवा मंडळांना तो रथ तेवढ्या उंचीच्या खाली फोल्ड करावा लागणार आहे. सध्या पुण्यात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रोचे कामदेखील अनेक ठिकाणी सुरू असल्याने पुणे पोलिसांनी या सूचना पुणे गणेशोत्सव मंडळांना केल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव यंदा कमी असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने पुण्यात गणेश मंडळे मोठ्या मिरवणुका काढतील यात काही शंका नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार रथाची उंची कमी ठेवावी लागणार असल्याने मंडळांचा मोठा हिरमोड झाल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community