कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्बंधांविषयी विशेष सूचना दिल्यावरही पुण्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट नियमांचे पालन करत नाहीत, असे निदर्शास आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंढवा पोलिसांनी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या चार हॉटेल्सवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांनो! महापालिका बांधतेय झाडावर घर… )
पोलिसांची कारवाई
हॉटेल ड्रंक अँड पांडा, हॉटेल लोकल, हॉटेल मेट्रो अशी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेलची नावे आहेत. या हॉटेलमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक धाडसत्र टाकत ही कारवाई केली आहे. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी एकाच्याही तोंडाला मास्क नसल्याचे दिसून आले. तसेच या ठिकाणी सुरू असलेले साउंड सिस्टीम पोलिसांनी स्वतः जाऊन बंद केली. या प्रकरणी रवी जनार्दन घोडके, मारुती कोंडीबा गोरे, कुणाल दशरथ गद्रे, राम जगन्नाथ गाढवे यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच याचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.
…तरीही नियमांचे उल्लंघन
कोरोना नियमांसंदर्भात हॉटेल मालकाला वेळोवेळी नोटीसही देण्यात आल्या होत्या. तसेच पोलिस आणि हॉटेल मालकांची बैठक घेऊनही कोरोना नियमांचे झाले उल्लंघन झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community